ब्रिटन, कॅनडात भारतीयांवर हल्ला करण्याचा कट

खलिस्तान समर्थकांचा वापर होणार : यंत्रणा सतर्क

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ब्रिटन आणि कॅनडामध्ये राहत असलेल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षेसाठी गंभीर इशारा जारी केला आहे. गुप्तचर सूचनेनुसार पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि खलिस्तानी समर्थक भारतीय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक मानले जाणाऱ्या लोकांवर हल्ले करण्याचा कट रचत आहेत. ब्रिटन आणि कॅनडामध्ये भारतीय समुदायाच्या विरोधात खलिस्तान समर्थकांकडून द्वेषगुन्हे आणि हिंसक घटनांमध्ये वाढ दिसून आली आहे. आता या घटना अधिक संघटितपणे घडविण्यात येण्याची भीती आहे. या संभाव्य हल्ल्यांना रोखण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा पाश्चिमात्य देशांच्या सुरक्षा यंत्रणांसोबत समन्वय राखून पावले उचलत आहेत.

खलिस्तान समर्थकांना पाठबळ पुरविणाऱ्या आयएसआयने युरोपमध्ये सक्रीय स्वत:च्या नेटवर्कला ब्रिटन अन् कॅनडातील भारतीय समुदायाच्या विरोधात कारवाया तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. आता या घटनांना एका सुनियोजित कटाच्या अंतर्गत मूर्त रुप दिले जाऊ शकते. आयएसआय भारतीय समुदायाच्या विरोधात सातत्याने हल्ले करण्याचा कट रचत आहे. खलिस्तानी समर्थकांकडून लोकांना भारतसमर्थक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थक ठरवत लक्ष्य केले जाऊ शकते असे आयबीच्या एका अधिकाऱ्याचे सांगणे आहे. खलिस्तानच्या मागणीला फारसा प्रतिसाद न मिळाल्याच्या निराशेतून आयएसआयने रणनीतित बदल केला आहे. आयएसआयच्या निशाण्यावर केवळ भारतीय समुदायच नसेल तर, खलिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या भारतीय यंत्रणांनाही लक्ष्य करण्याचा कट रचला जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

गँगस्टर नेटवर्कचा सहभाग

हिंसक घटना घडवून आणण्यासाठी आयएसआय स्वत:च्या गॅँगस्टर नेटवर्कचा वापर करू शकते. याकरता युरोप आणि भारतातील मॉड्यूलला सक्रीय करण्याचे निर्देश आयएसआयने दिले आहे. भारतात स्थानिक गँगस्टर्सद्वारे हल्ले घडवून आणण्याचा कट रचला गेला आहे.

खलिस्तान समर्थकांवर कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यातील बैठकांनंतर दोन्ही देशांचे संबंध सुधारले आहेत. यामुळे भारतीय यंत्रणांना खलिस्तान समर्थक नेटवर्कच्या विरोधात कारवाई करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे निराश झालेल्या आयएसआय आणि खलिस्तान समर्थक दहशतवादी नेटवर्कने आता विदेशातील भारतीयांना लक्ष्य करण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे समोर आले आहे.

स्थितीत बदल

अलिकडच्या वर्षांमध्ये ब्रिटन आणि कॅनडात खलिस्तानविषयी समर्थनात उल्लेखनीय घट झाली आहे. पूर्वी स्थानिक लोकसंख्येचा एक वर्ग खलिस्तानच्या मागणीबद्दल सहानुभूती बाळगत होता, परंतु आता स्थिती वेगाने बदलत आहे. खलिस्तान अन् त्याच्याशी संबंधित गँगस्टर नेटवर्क आता खंडणीवसुली, अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रतस्करी यासारख्या गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे लोकांचे मानणे आहे. ब्रिटन आणि कॅनडामध्ये राहणारे बहुतांश भारतीय वंशाचे लोक शांततापूर्ण जीवन इच्छितात. खलिस्तान समर्थकाच्या कारवाया सामाजिक सौहार्दाला प्रभावित करत असल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.

Comments are closed.