महापौरांच्या दालनात शिरुन तरुणाने गोंधळ घालत केली शिवीगाळ, गुन्हा दाखल, कर्मचाऱ्यांचं आंदोलन

परभणी : परभणी महापालिकेच्या महापौर सय्यद इकबाल यांच्या दालनात शिरुन तरुणाने गोंधळ घालत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा उद्देश होता असा आरोप महापौरांनी केला आहे. या प्रकरणी तरुणाला ताब्यात घेवून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. या घटनेनंतर महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.

महापौरांनी विनंती केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले

डम्पिंग ग्राउंडशी संबंधित तक्रारीच्या संदर्भामध्ये काय कारवाई करण्यात आली हे विचारण्यासाठी आलेल्या तरुणाने परभणी महापालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांच्या दालनामध्ये शिरून शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. तर या तरुणाच्या हातात धारदार शस्त्र होते, आपल्यावर हल्ला करणार होता. मात्र इथल्या कर्मचाऱ्यांनी आणि खाजगी सुरक्षा रक्षकांनी त्याला तत्काळ पकडले असल्याची माहिती महापौर सय्यद इकबाल यांनी दिली.  या प्रकरणी महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शेख रफिक शेख रौफ या तरुणा विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात  सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ परभणी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. मात्र, महापौरांनी विनंती केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान या प्रकारामुळे काही काळ महापालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments are closed.