पालघरमध्ये पुराचे विदारक चित्र, छतावर मृतदेह ठेवून पुरात काढले चार तास; केळव्यातील काळीज हेलावून टाकणारी घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

धुवाधार पावसाने पालघर जिल्ह्यात पुराने थैमान घातले असतानाच केळवे रोड येथील देवीपाड्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अख्ख्या गावाला पुराने वेढल्यामुळे एका कुटुंबाला त्यांच्या मृत नातेवाईकाचा मृतदेह तब्बल चार तास घराच्या छतावर ठेवून जीव मुठीत धरून बसावे लागले. काळीज हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सारेच जण हेलावले.

केळवे रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील देवीपाडा परिसरात धुवाधार पाऊस झाला. याचदरम्यान ५५वर्षीय अनुसया लिलका यांचे धुंदल वाडी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचा मृतदेह रात्री उशिरा रुग्णवाहिकेद्वारे केळवे रोड येथे आणण्यात आला. मात्र रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या अंडरपासमध्ये पाणी साचल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी मोठ्या कष्टाने मृतदेह खांद्यावर उचलून घरापर्यंत आणला.

सकाळी पावसाचा जोर वाढला आणि पुराचे पाणी घरात शिरले. त्यामुळे मृतदेह वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. कुटुंबाने धाडसी निर्णय घेत स्वयंपाकघराच्या छतावरील दोन सिमेंटचे पत्रे फोडले आणि मोठ्या प्रयासाने मृतदेह छतावर नेला. तो प्लॅस्टिकने झाकून ठेवत कुटुंबाने छताचाच आश्रय घेतला. तब्बल चार तास कुटुंबीय छतावर अडकून पडले होते. एका बाजूला प्रिय व्यक्तीचा मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा जीव वाचवण्याची धडपड, अशी भीषण परिस्थिती होती. काही तासांनी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुराचे पाणी ओसरले. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह पुन्हा खाली आणून अंत्यसंस्कार केले.

भिवंडी शहरातील नागाव भागात आज मोठी दुर्घटना टळली. १०० फुटी रस्त्यालगतच्या न्यू आजमी कंपाऊंड येथे असलेला सलमा अन्वर खान यांच्या मालकीचा यू एस टेक्सटाईल नावाचा यंत्रमाग कारखाना दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात काम करणारे सहा कामगार जेवायला गेल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला.

मात्र अन्य दोन कामगार जखमी झाले आहेत. दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा आणि धोकादायक कारखाने असूनही केवळ नोटिसा बजावण्याचे काम करीत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यू एस टेक्सटाईल या यंत्रमाग कारखान्याची इमारत धोकादायक असल्याने त्यास नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही येथे काम सुरू होते. आज दुपारी १२.३० ते १च्या सुमारास हा कारखाना अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ही दुर्घटना घडली त्याच्या काही मिनिटे आधी येथे काम करणारे सहा कामगार जेवायला बाहेर पडल्याने ते बचावले. परंतु अन्य दोन कामगार बाहेर निघत असतानाच कारखाना कोसळल्याने ते जखमी झाले आहेत. मात्र त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पालिका उपायुक्त सपना वसावा यांसह पालिका अधिकारी अग्निशामक दल, आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.

बळी गेल्यावर पालिकेला जाग येणार का?
पालिका प्रशासनाने धोकादायक ठरवलेल्या मालमत्तांना नोटीस बजावल्यानंतरही त्या रिकाम्या केल्या जात नाहीत. त्यामुळे भिवंडी परिसरात राजरोसपणे अनधिकृत आणि धोकादायक कारखाने सुरू आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून एखादी दुर्घटना घडून बळी गेल्यावर पालिकेला जाग येईल का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त कारखान्याच्या मालकावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त सपना वसावा यांनी दिली आहे.

Comments are closed.