कारशेडमधून सुटणारी लोकल पकडणाऱ्या प्रवाशांवर ‘वाॅच’, आरपीएफ कायदेशीर कारवाई करणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कळवा कार शेडमधून सुटणारी लोकल मुख्य प्रवेशद्वाराजवळील केबिनजवळ सिग्नलमुळे थांबताच प्रवासी अनधिकृतपणे गाडीत चढतात. सिग्नलच्या ठिकाणी रिकामी गाडी पकडणाऱ्या प्रवाशांवर आता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून यार्ड आणि कारशेडच्या आवारात लोकल पकडणाऱ्यांवर कठोर ‘वाॅच’ ठेवून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित प्रवाशांवर आरपीएफच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर कळवा कारशेडच्या परिसरात प्रवाशांकडून अनधिकृतपणे लोकल पकडण्याचे प्रकार वाढले आहेत. दररोज सकाळी ८ ते ८.३० या वेळेत जेव्हा कळवा कार शेडमधून सुटणारी लोकल ट्रेन मुख्य प्रवेशद्वाराजवळील केबिनजवळ सिग्नलमुळे थांबते, तेव्हा प्रवासी गेटमधून अनधिकृतपणे आत येतात आणि सिग्नलच्या ठिकाणीच ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. ही कृती अत्यंत धोकादायक आहे. सिग्नल मिळाल्यावर ट्रेन अचानक सुरू झाल्यास गंभीर अपघात होऊ शकतो, ज्यामुळे जीवितहानी किंवा शारीरिक इजा होण्याची शक्यता असते, अशी भिती व्यक्त करीत मध्य रेल्वे प्रशासनाने कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

प्रवाशांनी केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे, यार्ड, कार शेड किंवा सिग्नलच्या ठिकाणांहून ट्रेनमध्ये चढणे/उतरणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेने संबंधित विभागांशी समन्वय साधून कळवा कारशेडचे गेट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध सुरक्षा निकषांची पडताळणी करून सिग्नलवर ट्रेन थांबण्याची गरज कशी टाळता येईल, याचाही विचार केला जात आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी या ठिकाणी आरपीएफ जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार शेड किंवा प्रवाशांसाठी नसलेल्या इतर ठिकाणांहून रिकाम्या ट्रेनमध्ये चढणे अत्यंत धोकादायक आहे. रेल्वे कायद्यानुसार हा दंडनीय गुन्हा आहे. अनधिकृत ठिकाणांहून ट्रेनमध्ये चढणाऱ्या/उतरणाऱ्या आणि प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने रविवारी जाहीर केले.

Comments are closed.