मुंबई हादरली! पायधुनीत भरदिवसा 7 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव
मुंबईतील पायधुनी परिसरात आज हादरवून टाकणारी घटना घडली. येथील एका सोसायटीच्या वॉचमनने सात वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संतापलेल्या जमावाने पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव घातला व रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला.
भरदिवसा ही संतापजनक घटना घडली. पीडित मुलगी आज तिच्या इमारतीमधील वॉशरूममध्ये गेली होती. त्यावेळी तिथे कोणीही नसल्याचे पाहून इमारतीचा वॉचमन तिच्यामागे गेला. हा नराधम मुलीच्या पाठोपाठ वॉशरूममध्ये घुसला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारामुळे मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांची समजूत घालून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. या घटनेनंतर पोलीस ठाण्याबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
राहुल नार्वेकर यांना लोकांनी रोखले
या घटनेची माहिती घेण्यासाठी स्थानिक आमदार असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांना जमावाच्या रोषाचा सामना करावा लागला. नातेवाईक व नागरिकांनी त्यांना घेराव घातला व घटनेचा निषेध केला.
आरोपीला फाशी द्या!
या घटनेनंतर संतप्त पडसाद उमटले. लोकांनी पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. नराधमाला पोलीस ठाण्यातच फाशी द्या, अशी मागणी करत पोलीस ठाण्यासमोरच्या मुख्य रस्त्यावर निदर्शने व ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. येथील वाहतूकही काही वेळ विस्कळीत झाली.
Comments are closed.