पंढरीच्या वारीसाठी रेल्वे प्रशासन सज्ज; पंढरपूरसाठी मध्य रेल्वेच्या 150 फेऱ्या
आषाढीवारीच्या सोहळय़ासाठी देशभरातून पंढरीत येणाऱ्या रेल्वेच्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे विभागाने 150 फेऱ्यांचे विशेष नियोजन केले आहे.
येत्या शनिवार, 25 जुलै रोजी आषाढी वारीचा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होतो आहे. या सोहळय़ाला देशभरातून लाखो भाविक उपस्थिती लावतात. रेल्वेने पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी विशेष नियोजन केले आहे. खासकरून मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, जळगाव, मिरज, सोलापूर, कुर्डुवाडी, कोल्हापूर, परळी आणि परभणी या प्रमुख शहरांमधून मागणीनुसार रेल्वे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वारीच्या कालावधीत गेल्या वर्षी 137 फेऱ्यांची सेवा देण्यात आली होती. या वर्षी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने रेल्वे विभागाने 20 ते 29 जुलैदरम्यान 150 फेऱ्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक जयदीप प्रदक्षिणे यांनी दिली.
पंढरपूर रेल्वे स्थानकावर निवारा शेड उभारण्यात आले आहे. या शेडमुळे रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे तीन हजार भाविकांची ऊन, वारा व पावसापासून संरक्षण होणार आहे.
Comments are closed.