आसाममध्ये सापडला गोल्डन माकड

आसाम आणि भूतानच्या सीमावर्ती घनदाट जंगलांमध्ये एक असा दुर्लभ जीव राहतो, ज्याला पाहून निसर्गाच्या अद्भूत कलेची जाणीव होते. सोनेरी रंगाच्या फरने आच्छादलेला हा जीव गोल्डन माकडाच्या नावाने ओळखला जातो. झाडांच्या उंच फांद्यांवर उड्या घेणारे हे माकड जंगलाच्या सौंदर्यात भर घालत असते. परंतु आता त्यांची संख्या वेगाने घटत असून त्यांच्या अस्तित्वावर अनेक प्रकारचे धोके निर्माण झाले आहेत.

गोल्डन माकड जगातील सर्वात दुर्लभ प्रायमेट्समध्ये गणले जाते. त्यांचा नैसर्गिक अधिवास मुख्यत्वे आसामचे मानस क्षेत्र, चक्रशिला वन्यजीव अभयारण्य, रायमोना राष्ट्रीय उद्यान आणि काही राखीव वनांपर्यंत मर्यादित आहे. याचबरोबर भूतानच्या काही वनक्षेत्रांमध्येही त्यांचे अस्तित्व आढळून आले आहे. तज्ञांनुसार त्यांचा अधिवास सातत्याने आकुंचित पावत असल्याने त्यांची संख्या प्रभावित होत आहे.

या माकडांची सर्वात मोठी ओळख त्यांचा आकर्षक सोनेरी रंग आहे. नर गोल्डन माकडाचा रंग अधिक चमकदार असतो. तर मादी आणि पिल्लाचा रंग सौम्य असतो. काळा चेहरा आणि लांब रेशमी केसांमुळे याचे सौंदर्य आणखी वाढते. त्यांचे शेपूट संतुलन राखण्यास मदत करते आणि अनेकदा शरीरापेक्षाही लांब असू शकते. स्वभावाने अत्यंत शांत आणि लाजाळू असलेले हे माकड माणसांपासून अंतर राखणे पसंत करते.

जंगलांमध्ये वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे या माकडांसाठी अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. रस्ते निर्मिती, वीजवाहिनी आणि जंगलांची तोड यामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला नुकसान पोहोचत आहे. अनेकदा वीजवाहिन्यांच्या संपर्कात आल्याने किंवा रस्ता ओलांडताना होणाऱ्या दुर्घटनांमध्ये त्यांचा मृत्यू होतो. गोल्डन माकड हे जैवविविधतेचा अमूल्य वारसा आहे. वेळीच त्यांच्या संरक्षणासाठी पावले उचलली न गेल्यास आगामी पिढ्यांना त्यांचे दर्शन केवळ छायाचित्रे अन् पुस्तकांमध्येच होईल असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

Comments are closed.