'घोस्ट ऑन द माउंट्स' कॅमेऱ्यात कैद

पर्वतांच्या उंचीवर अनेक रहस्यं दडलेली असतात आणि निसर्ग जेव्हा स्वत:चे दुर्लभ रुप दाखवितो, तेव्हा माणूस थक्क होऊन जात असतो. अलिकडेच सिक्कीमच्या हिमाच्छादित शिखरांमधून एक असेच आकर्षक छायाचित्र समोर आले आहे, जे पाहून वन्यजीव प्रेमी रोमांचित झाले आहेत. भारतात पहिल्यांदाच दुर्लभ रानमांजर ‘यूरेशियन लिंक्स’ कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यूरेशियन लिंक्सला त्याच्या लपून राहण्याच्या सवयीमुळे अनेकदा ‘पर्वतांवरील भूत’ म्हटले जाते.

या दुर्लभ घटनेची माहिती आणि छायाचित्र भारतीय वनसेवेचे अधिकारी परवीन कासवान यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ब्लॅक अँड व्हाइट कॅमेरा ट्रॅपचे छायाचित्र शेअर कासवान यांनी ‘पर्वतांवरील भूत खरोखरच असतात, सिक्कीममध्ये या दुर्लभ यूरेशियन लिंक्सचे पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद होणे भारताच्या वन्यजीव संरक्षण कहाणीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. असा प्रत्येक शोध निसर्गाकडे अद्याप आमच्यासमोर उघड करण्यासाठी खूप काही आहे याची आठवण करून देतो’ असे म्हटले आहे.

5250 मीटरच्या उंचीवर यश

हे मोठे यश सिक्कीम वन आणि पर्यावरण विभाग तसेच डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाच्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम आहे. या दोन्ही संस्थांकडून एक दीर्घ ‘स्नो लेपर्ड आणि रेंजलँड मॉनिटरिंग प्रोग्राम’ राबविण्यात येत आहे. याच्या अंतर्गत उत्तर सिक्कीमच्या दुर्गम ‘त्सो ल्हामो पठार’वर अनेक कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. यातील एका कॅमेऱ्याने जवळपास 5250 मीटरच्या (17,200 फूट) उंची आणि कडाक्याच्या थंडीदरम्यान रात्रीच्या अंधारात या दुर्लभ जीवनाला स्वत:च्या लेन्समध्ये कैद केले आहे. यूरेशियन लिंक्सचा या भागातील वावर भारतीय हिमालयीन पर्यावरणीय व्यवस्था अद्याप किती समृद्ध आहे याचा ठोस पुरावा आहे.

भारतावर गर्व करण्याचे आणखी एक कारण

कासवान यांच्या या पोस्टला 19 हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. तसेच शेकडो युजर्सनी याला लाइक केले आहे. तर अन्य युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे आकर्षक आहे, भारतावर गर्व करण्याचे आणखी एक कारण, हिमालयीन क्षेत्र अत्यंत संवेदनशील आहे, जेव्हा तुम्ही पर्वतीय आणि वन्यभागांमध्ये पर्यटनासाठी जाल, तेव्हा निसर्गाचा सन्मान करा, प्लास्टिक किंवा कचरा फैलावू नका आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासात कुठलाच हस्तक्षेप करू नका अशा प्रतिक्रिया या पोस्टवर व्यक्त झाल्या आहेत.

Comments are closed.