मदत करताना ‘देवदूता’चा मृत्यू; सरकारची चार लाखांची मदत
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात मुसळधार पाऊस सुरू असताना महाकाय झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. ती सुरळीत करण्याचे काम करीत असताना अमन मुजावर या तरुणाच्या अंगावर झाड कोसळून त्याचा मृत्यू झाला. या ‘देवदूता’च्या कुटुंबाला सरकारने चार लाख रुपयांची मदत दिली आहे.
खोपोली येथे राहणारा अमन मुजावर याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची दखल घेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत आवाज उठवला. सेवाभावी काम करणाऱ्या स्वयंसेवकाच्या कुटुंबाला आर्थिक सहायय मिळावे यासाठी शासनाने मदत करावी, अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली. जाधव यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारचे प्रतिनिधी म्हणून खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी अमन मुजावर याच्या खोपोली शिळफाटा येथील घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेशही सुपूर्द केला.
अमन मुजावर हा तरुण समाजाभिमुख, सेवाभावी आणि संकटाच्या काळात मदतीसाठी तत्पर धावून जाणारा म्हणून परिचित होता. इतरांच्या सुरक्षिततेसाठी मदतकार्य करीत असतानाच त्याचा झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.