पुण्यातील 60 जणांच्या घरावर एकाचवेळी छापे; महाराष्ट्र एटीएसची सगळ्यात मोठी कारवाई, सोलापुरमधून

पुणे आणि सोलापूरमध्ये एटीएसची कारवाई महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी छापेमारी सुरू केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी (Shahzad Bhatti) आणि त्याच्या कथित आयएसआय (ISI) संपर्कांच्या अनुषंगाने 60 हून अधिक संशयित व्यक्तींवर एटीएसची नजर असून, त्यांच्या घरांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, आयएसआयकडून शहजाद भट्टीच्या माध्यमातून भारतातील काही तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा एटीएसला संशय आहे. त्याच अनुषंगाने या संशयितांची चौकशी आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीही काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांत एटीएसने याच प्रकरणाशी संबंधित छापेमारी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा एटीएसने राज्यभर कारवाईची मोहीम तीव्र केली असून, पुणे जिल्ह्यातील 60 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. (ATS Action In Pune)

संशयास्पद आर्थिक व्यवहारप्रकरणी सोलापुरातील NGO वर ATS ची कारवाई; एका पदाधिकाऱ्याला अटक- (ATS Action In Solapur)

सोलापूरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी न करता संस्थेने तब्बल 10 कोटी रुपयांची देणगी गोळा केल्याचा आरोप असून, या प्रकरणी संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात संस्थेने चुकीचे नोंदणी क्रमांक वापरून आयकर विभाग, देणगीदार आणि शासनाची फसवणूक केल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. या तिघांपैकी एका पदाधिकाऱ्याला ATS ने अटक केली असून, त्याच्या मोबाईलमध्ये 50 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचे संपर्क क्रमांक आढळल्याची माहिती तपास यंत्रणांनी न्यायालयात दिली आहे.

सोलापुरातील ही संस्था सुरू करण्यासाठी एका परदेशी संस्थेकडून 8 लाख रुपयांची देणगी मिळाल्याचेही तपासात समोर आले आहे. संबंधित परदेशी संस्थेचीही ATS मार्फत चौकशी करण्यात आली असून, त्या संस्थेच्या 15 बँक खात्यांतून तब्बल 126 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील संस्था आणि संबंधित परदेशी संस्थेकडे जमा झालेला निधी नेमका कशासाठी वापरला गेला, तसेच या पैशाचा वापर देशविघातक कृत्यांसाठी झाला का, या सर्व बाबींचा सखोल तपास मुंबई ATS करत आहे. दरम्यान, या प्रकरणातील अटकेत असलेल्या एका पदाधिकाऱ्याचा नियमित जामीन अर्ज तसेच अन्य दोन पदाधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. ही माहिती सोलापूरचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी दिली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Comments are closed.