लॉर्ड्सवर हरमनप्रीतचा 'राज'! मितालीचा रेकॉर्ड मोडत धोनी-विराट यांच्या खास यादीत एंट्री

भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी (१३ जुलै) लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर इतिहास रचला. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या पहिल्या महिला संघांच्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा २७० धावांनी पराभव केला. या विजयामुळे कर्णधार हरमनप्रीत कौरने एक विक्रम रचला, जो आतापर्यंत कोणत्याही भारतीय कर्णधाराला करता आला नाही.

भारताच्या दणदणीत विजयानंतर हरमनप्रीतने भारतीय महिला संघाची दिग्गज खेळाडू मिताली राजच्या नावावर असलेला एक विक्रम मोडला. हा विजय हरमनप्रीतचा कसोटी कर्णधार म्हणून चौथा विजय होता.

हरमनप्रीतने केवळ पाच कसोटी सामन्यांमध्ये चार सामने जिंकून, भारतीय महिला कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला. यापूर्वी राजने आठ कसोटी सामन्यांमध्ये तीन विजय मिळवले होते.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने फलंदाज म्हणूनही उत्तम कामगिरी केली. तिने पहिल्या डावत ५८ धावा करून संघाला २८५ धावसंख्या उभारण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांचा समाचार घेतला आणि पहिल्या डावात १०५ धावांची आघाडी घेतली.

या सामन्यात भारताच्या ऐतिहासिक विजयात इतर खेळाडूंनीही मोलाची भुमिका बजावली. विकेटकीपर-फलंदाज यास्तिका भाटियाचे दुसऱ्या डावातील शतक, स्म्रितीचे दोन्ही डावात अर्धशतक, वेगवान गोलंदाज क्रांती गौडच्या पहिल्या डावातील ५ विकेट्स आणि फिरकीपटू स्नेह राणाच्या दुसऱ्या डावातील ४ विकेट्स या कामगिरी उल्लेखनीय ठरल्या.

कॅप्टन हरमनप्रीतचा धमाका
लॉर्ड्सवर कसोटी सामने जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत आता हरमनप्रीतचा समावेश झाला आहे. ती या ऐतिहासिक मैदानावर कसोटी सामना जिंकणारी चौथी भारतीय कर्णधार ठरली आहे.

हरमनप्रीतच्या आधी कपिल देव (१९८६), एमएस धोनी (२०१४) आणि विराट कोहली (२०२१) यांनी भारताला लॉर्ड्सवर कसोटी विजय मिळवून दिला आहे.

हरमनप्रीत आधीच भारतीय संघाची सर्वात यशस्वी टी २० कर्णधार आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारताने ८४ टी २० सामने जिंकले आहेत. तसेच तिच्याच नेतृत्वाखाली संघ पहिल्यांदा वनडे विश्वविजेता ठरला होता. ती तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ११८ विजयांसह भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.

Comments are closed.