“विराटला आता काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, त्याचे लक्ष्य केवळ…” माजी क्रिकेटपटूचे कोहलीबाबत मोठे वक्तव्य

आजपासून (14 जुलै) इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरूवात होत आहे. आयसीसी पुरुष विश्वचषक 2027 च्या तयारीची सुरूवात म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. या मालिकेमुळे पुन्हा एकदा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

सध्या दोघे केवळ भारतासाठी वनडे फॉरमॅटमध्येच खेळतात. त्यामुळे दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटूने विराटबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. पार्थिव पटेलच्या मते, विराटला आता काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. भारतीय संघाने त्याच्या फॉर्मचा फायदा घ्यावा. त्याने सर्वकाही साध्य केले आहे. कदाचित आता त्याच्याकडे केवळ एकच प्रेरणा बाकी आहे, ती म्हणजे 100 शतके करणे.

जिओहॉटस्टारच्या एका कार्यक्रमात भारताचा हा माजी विकेटकीपर म्हणाला, “विराट कोहलीला आता आणखी काय साध्य करायचे उरले आहे? त्याने 2011 मध्ये विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली; तसेच, जी एकमेव ट्रॉफी त्याच्या नावावर नव्हती, तो टी 20 विश्वचषकही त्याने जिंकला. त्याच्या नेतृत्वाखाली भारत कसोटी क्रिकेटमध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा संघ बनला आणि त्याने ऑस्ट्रेलियातही संघाला मालिका विजय मिळवून दिला. त्यामुळे, माझ्या मते आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तो किती प्रेरित आहे. ‘शतकांचे शतक’ (100 शतके) हे त्याचे एक उद्दिष्ट असू शकते.”

“जर हे उद्दिष्ट त्याच्या मनात असेल, तर धावा करण्याच्या प्रक्रियेतून ते आपोआप साध्य होईल. आणि जर त्याने परदेशातील खेळपट्ट्यांवर धावा केल्या व तो चांगल्या लयीत असेल, तर त्याचा फायदा संघातील इतर फलंदाजांनाही होईल. त्याचे संघात असणे नक्कीच फायदेशीर ठरेल,” असेही पटेलने पुढे म्हटले आहे.

विराटने आतापर्यंत 85 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.

Comments are closed.