मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं
मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे. ओशिवरा पोलीस स्टेशनच्या (Oshiwara Police Station) अवघ्या 100 मीटर अंतरावरील सिग्नलवर एका पतीने आपल्या पत्नीची दगडाने गळा ठेचून निर्घृण हत्या केली. थेट पोलीस स्टेशनच्या शेजारीच हा प्रकार घडल्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
Mumbai Oshiwara Crime News : दारूच्या नशेत वाद अन् टोकाचे पाऊल
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत महिला आणि तिचा पती हे दोघे ओशिवरा पोलीस स्टेशनच्या जवळील सिग्नलवर रस्त्यावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दोघेही दारूच्या नशेत होते.
याच दरम्यान दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण सुरू झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात पतीने रस्त्याशेजारी असलेला मोठा दगड उचलला आणि थेट पत्नीच्या गळ्यावर आणि डोक्यावर प्रहार करत तिला जागेवरच ठेचून संपवले.
Mumbai Oshiwara Police Action : आरोपी पतीला अटक
पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच हा प्रकार घडल्याने घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला ताब्यात घेऊन तात्काळ कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) उपचारासाठी पाठवले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
ओशिवरा पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला घटनास्थळावरूनच अटक केली आहे. आरोपीने एवढी टोकाची भूमिका का घेतली? आणि या हत्येमागे नेमके काय कारण होते?, या संदर्भात ओशिवरा पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
ही बातमी वाचा:
Comments are closed.