ICC कडून वनडे आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदल; आता सामने अधिक रोमांचक आणि थरारक होणार!
क्रिकेटचा थरार अधिक रोमांचक करण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुरुष वनडे आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये मोठे बदल केले आहेत. या नव्या बदलांमुळे क्रीडा प्रेमींना चुरशीचे सामने पाहायला मिळण्याची ICC ला अपेक्षा आहे. या नव्या रचनेमुळे सुरुवातीच्या सामन्यांपासूनच संघांवर दबाव असेल, दबावामुळे चौकार-षटकारांची आतषबाजीचा प्रेक्षकांना आनंद घेता येईल, तसेच हाय-व्होल्टेज सामने पाहायला मिळतील.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) एडिनबर्ग येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या बदलांचा मुख्य उद्देश टूर्नामेंटमधील प्रत्येक सामना अधिक चुरशीचा, स्पर्धात्मक आणि रोमांचक बनवणे हा आहे. वनडे विश्वचषकात 14 संघ कायम राहतील, पण स्पर्धा आता तीन टप्प्यांत खेळवली जाईल. पहिल्या टप्प्यात तळाच्या तीन संघांमध्ये (12, 13 आणि 14 व्या क्रमांकाचे संघ) ‘सुपर सिरीज’ खेळवली जाईल, ज्यातून एक संघ पुढे जाईल. दुसऱ्या टप्प्यात 12 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागले जाईल, ज्यातून प्रत्येकी 3-3 आणि एक सर्वोत्तम संघ असे एकूण 7 संघ ‘सुपर-7’ मध्ये पोहोचतील. ‘सुपर-7’ मधील सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळतील आणि टॉप-4 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
टी-20 विश्वचषकात आता ‘सुपर-8’ ऐवजी ‘सुपर-10’ चा वापर केला जाईल. पहिल्या टप्प्यात चार ऐवजी पाच ग्रुप असतील, ज्यातून 10 संघ दुसऱ्या टप्प्यात पोहोचतील. या 10 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागले जाईल. दोन्ही ग्रुपमधील टॉप संघ थेट सेमीफायनलमध्ये जातील, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये ‘एलिमिनेटर’ सामने होतील. एलिमिनेटर जिंकणारे दोन संघ सेमीफायनलची उरलेली दोन ठिकाणे निश्चित करतील. बैठकीत 2028 च्या पुरुष टी-20 विश्वचषकासाठी नवीन पात्रता प्रणालीलाही मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये स्कॉटलंडला थेट युरोप प्रादेशिक फायनलमध्ये प्रवेश मिळेल. याशिवाय, उदयोन्मुख देशांसाठी 16 संघांची एक नवीन जागतिक टी-20 स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या नवीन स्पर्धेला अंतिम मंजुरी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या वित्त व व्यावसायिक व्यवहार समितीच्या पुनरावलोकनानंतर दिली जाईल.
Comments are closed.