रत्नागिरी न्यूज – आंजर्ले तारीबंदर येथे भीषण आग; 40 लाखांचे नुकसान, दोन मासेमारी नौका जळून खाक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली तालुक्यातील आंजर्ले तरीबंदरावर मंगळवारी (१४ जुलै २०२६) मध्यरात्री भीषण आग लागून दोन मासेमारी बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

आंजर्ले ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पार्किंगसाठी उभ्या असलेल्या बोटींना अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत शेजारी उभ्या असलेल्या बोटींनाही वेढले. परिसरातील मच्छीमार व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र आग वेगाने पसरल्याने ‘पौर्णिमा’ (मालक – प्रवीण रघुवीर) आणि ‘दिव्यतेज’ (मालक – जगन्नाथ पावसे) या दोन बोटींसह त्यांवरील मासेमारीची जाळी, इंजिन व इतर साहित्य जळून खाक झाले. घटनेनंतर स्थानिकांनी दापोली नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. मात्र अग्निशमन बंब निकामी असल्याचे सांगण्यात आल्याने खेड येथील अग्निशमन केंद्राला पाचारण करण्यात आले. खेडहून बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन्ही बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

बुधवारी महसूल विभाग आणि पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. नुकसानाचा अंतिम आकडा पंचनामा पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. आग शॉर्टसर्किट, इंधन गळती किंवा अन्य कोणत्या कारणामुळे लागली, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे संबंधित बोटमालकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. तसेच दापोली तालुक्यासाठी सक्षम आणि सुसज्ज अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करण्याची मागणीही या निमित्ताने पुन्हा जोर धरू लागली आहे.

Comments are closed.