Ratnagiri News – इन्स्टाग्रामवरील फोटोच्या आधारे डॉक्टरला ब्लॅकमेल; दोघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील एका डॉक्टरला इन्स्टाग्रामवरील फोटोचा आधार घेत ब्लॅकमेल करून २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी लांजा तालुक्यातील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच ऑनलाइन गुगल पेद्वारे उकळलेले २५ हजार रुपये संबंधित डॉक्टरला परत मिळवून देण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तपासादरम्यान या प्रकरणात कोणतीही महिला सहभागी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लांजा तालुक्यातील सिद्धेश जयवंत आंब्रे (३१) रा. सडवली मावळतवाडी, ता. लांजा आणि सोहम गंगाराम विर्हाडी (२०) रा. खांचलवाडी, गोळवशी, ता. लांजा यांनी डॉक्टरांनी इन्स्टाग्रामवरून पाठविलेल्या फोटोंचा गैरवापर करून त्यांना व्हॉट्सअॅपवर तेच फोटो पाठवत बदनामीची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी मे २०२६ मध्ये राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासात आरोपी सिद्धेश आंब्रे याने डॉक्टरांकडे २ लाख २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे उघड झाले. त्यापैकी २५ हजार रुपये गुगल पेद्वारे स्वीकारण्यात आले होते. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तपासात दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच खंडणी म्हणून उकळलेले २५ हजार रुपये फिर्यादी डॉक्टरला परत मिळवून देण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सायबर माध्यमांचा वापर करून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी उकळण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, फोटो किंवा संवेदनशील मजकूर शेअर करताना अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राजापूर पोलिसांनी केले आहे.

Comments are closed.