Ratnagiri News – दापोलीतील आघारी समुद्रकिनारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू
दापोली तालुक्यातील आघारी गावच्या समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी सुमारे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्यासह मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आघारी येथील रहिवासी देवजी लक्ष्मण रहाटे हे शनिवारी (११ जुलै) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ग्रामदैवत महामाई देवीच्या पूजेसाठी समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागातून जात होते. त्यावेळी समुद्राच्या पाण्यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट तरंगताना त्यांच्या निदर्शनास आला. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, तेथे अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती त्यांनी तात्काळ माजी पोलीस पाटील चंद्रकांत कानसे यांना दिली. त्यानंतर दाभोळ सागरी पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Comments are closed.