Ratnagiri News – शिक्षकाचा विद्यार्थिनीला अश्लील संदेश; मंडणगडात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
दापोलीमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार व विनयभंगाच्या महिनाभरात पाच घटना नोंदवल्या गेल्यानंतर, आता शेजारील मंडणगड तालुक्यातही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलवर आक्षेपार्ह व अयोग्य आशयाचे संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी संशयित शिक्षक दीपक अंकुश गर्जे (वय ४२, मूळ रा. अहिल्यानगर, सध्या रा. मंडणगड) याच्याविरुद्ध मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पीडित मुलगी सध्या तिच्या आजीकडे राहत असून, आजीचा मोबाईल तीच हाताळत होती. संशयित शिक्षक हा विद्यार्थिनीच्या पूर्वीच्या शाळेत कार्यरत होता, तसेच तिचा लहान भाऊ अजूनही त्याच शाळेत शिकत असल्याने त्यांची ओळख होती. दरम्यान, शाळेतील अभ्यास आणि पालकसभा आदी माहिती देण्याच्या बहाण्याने या शिक्षकाने ४ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत विद्यार्थिनीला मोबाईलवर अत्यंत आक्षेपार्ह संदेश पाठवले. या प्रकारामुळे घाबरलेल्या व संकोचलेल्या विद्यार्थिनीने त्या संदेशांचे स्क्रीनशॉट काढून आपल्या मामाला दाखवले आणि ती मावशीकडे निघून गेली.
अखेर १३ जुलै रोजी पीडितेने नातेवाईकांसह मंडणगड पोलिस ठाण्यात हजर राहून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीवरून संशयित शिक्षकाविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३’ मधील कलम ७५(१), ७५(२), ७८(२) तसेच ‘बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा २०१२’ च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगडचे पोलिस निरीक्षक भरत धुमाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Comments are closed.