Latur News – कौटुंबिक वादातून पुतण्याने सख्ख्या चुलत्याचा खून केला; दगडाने ठेचलं आणि स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
निलंगा तालुक्यातील हरी जवळगा येथे कौटुंबिक वादातून आणि जुन्या रागातून पुतण्याने आपल्या सख्या चुलत्याचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना दिनांक १५ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता सुमारास घडली आहे. राजकुमार चव्हाण (वय ५८ वर्षे) असे मृत चुलत्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चुलत्याचा खून केल्यानंतर आरोपी पुतण्या स्वतःहून कासार शिरशी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास राजकुमार चव्हाण हे आपल्या शेतात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेला आरोपी पुतण्या मुरली चव्हाण याने त्यांना गाठले. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात मुरली चव्हाण याने चुलत्याच्या डोक्यात व शरीरावर दगडाने गंभीर प्रहार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, राजकुमार चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.
चुलत्याचा जीव घेतल्यानंतर आरोपी मुरली चव्हाण हा पळून न जाता थेट कासार शिरशी पोलीस ठाण्यात पोहोचला. “मी माझ्या चुलत्याचा खून केला आहे, मला अटक करा,” असे सांगत तो स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. आरोपीच्या या कबुलीने पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारीही चक्रावून गेले होते.
या हत्येमागील कारण अत्यंत धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. मृत राजकुमार चव्हाण यांच्या मुलाचे आरोपी मुरली चव्हाण याच्या थोरल्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांमुळे भावाचा संसार मोडला होता. “तुमच्या मुलाला समजावून सांगा, माझ्या भावाचा संसार वाचवा,” असे मुरली याने चुलत्याला अनेकदा बजावले होते. मात्र, वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आरोपीच्या मनात तीव्र राग होता. आज शेतात याच विषयावरून पुन्हा वाद झाला आणि त्यातूनच हे थरारनाट्य घडले.
च्या
घटनेची माहिती मिळताच कासार शिरशी पोलीस ठाण्याचे पथक हरी जवळगा गावात दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा रीतसर पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टन) जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेमुळे गावात सध्या अत्यंत तणावपूर्ण वातावरण असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस गावात परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणी कासार शिरशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तवर सुरू होती.
Comments are closed.