जगन्नाथ पुरी रथयात्रेला आजपासून सुरुवात होत आहे.
24 जुलैपर्यंत चालणार उत्सव : लाखो भाविकांची उपस्थिती
वृत्तसंस्था/ पुरी
ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांची रथयात्रा गुरुवार, 16 जुलैपासून सुरू होत आहे. हा भव्य उत्सव 24 जुलैपर्यंत चालेल. याप्रसंगी 10 लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. भगवानांच्या भव्य रथोत्सवाची (घोष यात्रेची) सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. रथ, मार्ग आणि भक्तगण या अनमोल क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
भगवान जगन्नाथांची रथयात्रा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या, भव्य आणि प्राचीन धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी पुरी येथील या मिरवणुकीत भारत आणि परदेशातून लाखो भाविक सहभागी होतात. या काळात भगवान जगन्नाथ, त्यांचे थोरले बंधू भगवान बलभद्र आणि भगिनी देवी सुभद्रा यांच्यासह आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी मंदिरातून बाहेर येतात. भगवान आपल्या भव्य रथांमधून आपल्या भक्तांचे दर्शन घेतात. भव्य मार्गावर (बडा दंडा) भक्त आणि भगवान यांच्या अद्वितीय मिलनाचा साक्षात्कार होतो.
कडक पोलीस बंदोबस्त, गर्दीचे व्यवस्थापन
शिस्तबद्ध आणि अपघातमुक्त रथयात्रा पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. पोलीस विभागाला गर्दी नियंत्रण, भाविकांची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. एका विशेष बैठकीत पोलीस महासंचालकांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या भूमिका आणि कर्तव्यांविषयी माहिती दिली.
शहरातील बुकिंग हाऊसफुल्ल
रथयात्रेसाठी पुरीमधील हॉटेल्स आणि लॉजेस आधीच पूर्णपणे हाऊसफुल्ल झाली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच बुकिंग सुरू झाले होते. मंदिर आणि रथयात्रेच्या मार्गाजवळील हॉटेल्स आणि लॉजेसना मोठी मागणी असते. रथयात्रेचा मार्ग दिसणाऱ्या बाल्कनी किंवा खिडक्या असलेल्या हॉटेल्सना विशेष मागणी असते. गेल्यावर्षीच्या तुलनेत हॉटेल आणि लॉजचे दर 10 पटींपर्यंत वाढले आहेत. ज्या लॉजेसचे भाडे साधारणपणे 1,500 ते 2,000 रुपये असते, ते आता रथयात्रेदरम्यान तीन दिवसांसाठी 10 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत आकारतात. संपूर्ण शहरात अंदाजे 1,200 हॉटेल्स आहेत.
रथोत्सवाचे नियोजन…
रथोत्सव मार्गातील एकसमानता : पहिल्यांदाच संपूर्ण रथयात्रेच्या मार्गावरील इमारतींना फिकट गुलाबी रंग देण्यात आला आहे. श्रीमंदिर आणि संपूर्ण यात्रा मार्गही सजवण्यात आला आहे.
आपत्कालीन स्थलांतर मार्गिका : विशेष मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत जेणेकरून गर्दी झाल्यास किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि मदत पथके त्वरीत पोहोचू शकतील.
रिअल टाइम क्राउड मॅनेजमेंट : पहिल्यांदाच भाविकांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून गर्दीवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल.
एआय कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवणे : पहिल्यांदाच, संपूर्ण रथयात्रेवर एआय-आधारित कॅमेरे, ड्रोन आणि रिअल-टाइम कंट्रोल रुमच्या माध्यमातून सतत देखरेख ठेवली जाईल.
Comments are closed.