सिया गोयलच्या वडिलांच्या अडचणीत वाढ, विनापरवाना दुकान सील; आता भेसळ सिद्ध झाल्यास होणार मोठी का

पुणे मार्केटमधील सिया गोयल फादर शॉपवर एफडीएची कारवाई पुण्याच्या लोहगड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agarwal Case) मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) हिच्या कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये आता कमालीची वाढ झाली आहे. सिया गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत असतानाच, आता तिच्या वडिलांच्या व्यवसायावर अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड भागातील त्यांचे दुकान विनापरवाना सुरू असल्याचे समोर आल्यानंतर ते तात्काळ सील करण्यात आले असून, जप्त केलेल्या अन्नपदार्थांच्या नमुन्यांमध्ये भेसळ आढळल्यास थेट जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

Siya Goyal: 8 लाखांचा मुद्देमाल जप्त!

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण राज्यात दूषित आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कडक मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील सियाच्या वडिलांच्या ‘बी. जी. गोयल अँड कंपनी’ या मसाल्याच्या दुकानावर अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान दुकानातील अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी कारवाई करत तब्बल 4 हजार 172 किलोचा साठा जप्त केला असून, या जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 8 लाख 14 हजार 630 रुपये इतकी आहे.

Siya Goyal: भेसळीचा संशय; व्यवसाय बंद करण्याची नोटीस

या धडक कारवाईबाबत माहिती देताना एफडीएचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी सांगितले की, “संबंधित आस्थापन हे कोणत्याही वैध परवान्याशिवाय व्यवसाय करत असल्याचे आणि अन्न सुरक्षा मानांकनाचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या दुकानाचा परवाना एका जागेचा असताना प्रत्यक्षात व्यवसाय मात्र दुसऱ्याच ठिकाणी सुरू होता.”

तपासणी दरम्यान लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून एफडीएने एकूण चार प्रकारचे नमुने घेतले आहेत. यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारची हळद, एका ब्रँडचे तीळ आणि सोया चंक्सचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नियमांचे पालन न केल्यामुळे प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत हा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

Siya Goyal: पाच लाखांचा दंड की जन्मठेप? कायद्यात काय आहे तरतूद?

सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या नमुन्यांचा प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जाईल. जर या अन्नपदार्थांमध्ये केवळ भेसळ आढळली, तर आरोपीला 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र, जर हे अन्नपदार्थ मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि खाण्यास अयोग्य असल्याचे सिद्ध झाले तर दोषीला थेट जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर ‘या’ चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली

Comments are closed.