हिंदूला कलामा शिकवण्याचा प्रयत्न
हैद्राबादमध्ये मुस्लीम शिक्षिकेची हकालपट्टी
वृत्तसंस्था/हैद्राबाद
तेलंगणा राज्याची राजधानी हैद्राबाद येथे एका शाळेत हिंदू विद्यार्थ्याला कलमा पढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मुस्लीम शिक्षिकेची हाकालपट्टी करण्यात आली आहे. या शिक्षिकेने दुसरीच्या वर्गात असलेल्या एका हिंदू विद्यार्थ्याला गृहपाठ म्हणून कलमा तोंडपाठ करण्याचा आणि तो म्हणण्याचा आदेश दिला होता. तसेच त्याला शूरा अल् फतीहाही पाठ करण्याचा आदेश देण्यात आला होता. हैद्राबादच्या ‘सक्सेस’ नामक शाळेत हा प्रकार घडला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. नोकरीवरुन काढलेल्या शिक्षिकेचे नाव शेख आयेशा परवीन असे आहे. या हिंदू विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याची गृहपाठ दैनंदिनी तपासली असता त्यांना अशा प्रकारचा गृहपाठ देण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्याकडे चौकशी केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. पालकांनी या शिक्षिकेच्या विरोधात शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार सादर केल्यानंतर व्यवस्थापनाने ही कारवाई केली.
निर्माण झाला तणाव
हे प्रकरण सोशल मिडियावरुन प्रसिद्ध झाल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. तेलंगणातील भारतीय जनता पक्षाचे नेते एन. रामचंद्र राव यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून शिक्षिकेची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. हा केवळ एका शिक्षिकेने केलेला प्रकार असण्याची शक्यता कमी आहे. हे एक सुनियोजित कारस्थान असून त्याचे अनेक सूत्रधार असण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या निरागसतेचा गैरफायदा घेऊन त्यांचे धर्मांतर घडवून आणण्याचा हा व्यापक कट आहे. त्यामुळे केवळ शिक्षिकेला कामावरुन काढून टाकून भागणार नाही. हे कारस्थान उघडकीस आणले पाहिजे आणि त्याचे सूत्रधार उघडे पडले पाहिजेत, असे प्रतिपादन रामचंद्र राव यांनी गुरुवारी केले आहे.
निराश प्रतिसाद
सोशल मिडियावरही या प्रकरणासंबंधी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा ‘शिक्षण जीहाद’चा प्रकार आहे. त्याची व्यापक चौकशी झाली पाहिजे. पालकानी आता सावधपणे आपल्या अपत्यांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. विद्यार्थी जेव्हा त्यांच्या कुटुंबाबाहेर असतात, तेव्हा तो कोणाच्या संगतीत असतात आणि शाळांमध्ये त्यांना कोणते शिक्षण देले जाते, यावर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवणे अनिवार्य बनले आहे. प्रशासनानेही अशी प्रकरणे गंभीरपणे घेतली पाहिजेत, अशा प्रतिक्रिया अनेक मिडिया युजर्सनी व्यक्त केल्या आहेत.
Comments are closed.