गुड न्यूज…पेंग्विनचा पाळणा हलला! उद्यानात आणखी चार पिल्लांचा जन्म, एकूण संख्या 25 वर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातून पुन्हा एकदा ‘गुड न्यूज’ आली आहे. पेंग्विनच्या कुटुंबात आणखी चार पिल्लांचा जन्म झाला आहे. त्यामुळे मुंबईकर-पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेल्या पेंग्विनची संख्या आता 25 वर पोहोचल्याची माहिती उद्यान व प्राणी संग्रहालय संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

पालिकेच्या माध्यमातून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचा कायापालट करण्यात आला आहे. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून 2017 मध्ये उद्यानात केवळ परदेशात आढळणारे पेंग्विन आणल्यानंतर दररोज पाच ते सहा हजार असणारी पर्यटकांची संख्या आता सरासरी 15 ते 20 हजारांवर तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पंचवीस हजारांवर जात आहे. त्यामुळे याआधी दररोज 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता महिन्याला एक कोटी तर वर्षाचे उत्पन्न बारा कोटींपर्यंत गेले आहे. उद्यानात परदेशातून सुरुवातीला सात पेंग्विन आणले गेले होते.

साताचे झाले पंचवीस

उद्यानात पेंग्विन जन्मल्यानंतर पिल्लांचे बारसं करून नामकरणही केले जाते. साधारणतः तीन महिन्यांनतर नर-मादी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि प्रकृतीच्या तंदुरुस्तीनंतरच हे नामकरण करण्यात येते. त्यामुळे नव्या चारही पेंग्विनचे नामकरण बारसं सोहळा आयोजित करून केले जाणार असल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापौरांनाही पेंग्विनची भुरळ

शिवसेनेच्या पुढाकाराने पेंग्विन आणल्यानंतर तत्कालीन विरोधक भाजपकडून जोरदार टीका केली जात होती. मुंबईकरांचे पैसे वाया गेल्याचा आरोप केला जात होता. मात्र आज चक्क महापौर रितू तावडे यांनी आपल्याला पेंग्विन खूप आवडत असल्याचे सांगत या प्रकल्पाचे कौतुक केले. पेंग्विनची अदाकारी, त्यांचे आपल्याकडे पाहणे भावत असल्याचे त्या म्हणाल्या.

Comments are closed.