आता खेळा बिनधास्त! फ्रान्स व इंग्लंड तिसऱ्या स्थानासाठी भिडणार; एम्बाप्पे आणि हॅरी केन गोल्डन बूटच्या शर्यतीत

फिफा वर्ल्ड कपचे अव्वल दोन संघ ठरले आहेत, पण युरोपीय दिग्गज फ्रान्स आणि इंग्लंड यांनी दिलेला अपरिमित आनंद कोणीही विसरू शकणार नाही. या दोन्ही संघांना वर्ल्ड कप जिंकण्याची संधी नसली तरी तिसऱ्या स्थानासाठी ते शनिवारी रात्री एकमेकांना भिडणार आहेत. किलियन एम्बाप्पेने गोलधडाका लावला होता, तर हॅरी केननेही त्याच्याबरोबर गोल्डन बूटच्या शर्यतीत आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ अब्जावधी लोकांच्या दडपणाचं ओझं घेऊन खेळले होते; पण या सामन्यात बिनधास्तपणे दोन्ही संघांतील खेळाडू खेळू शकतात. त्यामुळे या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

एम्बाप्पेसह केनगोल्डन बूटच्या शर्यतीत

उपांत्य फेरीत फ्रान्सचा स्पेनकडून 2-0 असा पराभव झाला, तर इंग्लंडला अर्जेंटिनाकडून 2-1ने पराभव पत्करावा लागला. हा सामना वैयक्तिक कामगिरीसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. फ्रान्सचा कर्णधार एम्बाप्पेला गोल्डन बूट जिंकण्याची ही त्याची शेवटची संधी असेल. स्पर्धेत आठ गोल करणाऱ्या एमबाप्पेने जर या सामन्यात गोल केला तर तो लिओनेल मेस्सीला मागे टाकू शकतो. दरम्यान, इंग्लंडचे हॅरी केन आणि ज्यूड बेलिंगहॅम हेदेखील प्रत्येकी सहा गोलांसह गोल्डन बूटच्या शर्यतीत आहेत.

फ्रान्सची आतापर्यंतची कामगिरी

फ्रान्सने या विश्वचषकाची सुरुवात दमदार केली. त्यांनी आपल्या सलामीच्या सामन्यात सेनेगलला 3-1ने हरवले, त्यानंतर इराकला 3-0 ने पराभूत केले आणि नॉर्वेवर 4-1 असा दणदणीत विजय मिळवून गटात अव्वल स्थान पटकावले. बाद फेरीमध्ये फ्रान्सने स्वीडनला 3-0 ने हरवले, त्यानंतर पॅराग्वे आणि मोरोक्कोसारख्या बलाढय़ संघांवर मात करून उपांत्य फेरी गाठली. तथापि, स्पेनविरुद्ध संघाला आपली लय कायम राखता आली नाही आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.

इंग्लंडचा कसा होता प्रवास

इंग्लंडचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात क्रोएशियाला 4-2 ने हरवले, परंतु दुसऱया सामन्यात घानाविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधावी लागली. यानंतर त्यांनी पनामावर विजय मिळवून गटात पहिले स्थान मिळवले. बाद फेरीमध्ये इंग्लंडने कोंगो, सह-यजमान मेक्सिको आणि नॉर्वे यांसारख्या संघांना हरवून सेमी फायनलमध्ये स्थान मिळवले. उपांत्य फेरीत संघाने अर्जेंटिनाविरुद्ध चांगली सुरुवात केली, पण अखेरीस त्यांना पराभव पत्करावा लागला.

फ्रान्स व इंग्लंडमध्ये कोण सरस

इतिहासाकडे पाहिल्यास फ्रान्स चौथ्यांदा विश्वचषकातील तिसऱया स्थानासाठीचा सामना खेळत आहे. त्यांनी 1958 मध्ये पश्चिम जर्मनी आणि 1986 मध्ये बेल्जियमला हरवून कांस्यपदक जिंकले होते, तर 1982 मध्ये पोलंडकडून त्यांचा पराभव झाला होता. दुसरीकडे इंग्लंड तिसऱयांदा कांस्यपदकासाठी खेळणार आहे. यापूर्वी 1990 मध्ये इटली आणि 2018 मध्ये बेल्जियमकडून त्यांचा पराभव झाला होता. या दोन संघांमध्ये आतापर्यंत 32 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, ज्यात विश्वचषकातील तीन सामन्यांचा समावेश आहे. इंग्लंडने 17 सामने जिंकले आहेत, तर फ्रान्सने 10 सामने जिंकले आहेत.

Comments are closed.