भारताविरुद्धच्या लॉर्ड्सवरील वनडेपूर्वी इंग्लंडचा मोठा निर्णय, पहिल्या सामन्यात फिफ्टी करणाऱ्या खेळाडूसह दोघांना संघातून केले मुक्त

इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेली तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील अंतिम सामना रविवारी (19 जुलै) लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघातून दोन खेळाडूंना मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. लियाम डॉसन आणि टॉम बॅंटन हे तिसऱ्या वनडे सामन्याला मुकणार आहेत.

आता इंग्लंडने अतिमहत्त्वाच्या वनडे सामन्यासाठी हा निर्णय का घेतला, ते जाणून घेऊ.
बॅंटन आणि डॉसन 18 जुलै रोजी होणाऱ्या टी 20 ब्लास्टच्या उपांत्य फेरींच्या सामन्यात आपापल्या काउंटी क्लबकडून खेळू शकतील. त्यांच्या बदली खेळाडूची इंग्लंडने अद्याप घोषणा केलेली नाही.

दोघांनी मालिकेत किती सामने खेळले?
या मालिकेत इंग्लंडने बॅंटन आणि डॉसन यांचा संघात समावेश केला. बॅंटनला खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र डॉसन पहिल्या सामन्यात खेळला होता. यामध्ये त्याने ६८ धावा केल्या आणि जो रूटसोबत १२१ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर त्याला दुसऱ्या सामन्यासाठी अंतिम अकरामध्ये संघात जागा मिळाली नाही.

आता हे दोघे टी २० ब्लास्टच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळणार आहे. यामध्ये डॉसन हॅम्पशायर आणि बॅंटन सॉमरसेट संघाचे भाग आहेत. त्याप्रमाणे पहिला उपांत्य सामना नॉर्थम्प्टनशायर आणि सॉमरसेट यांच्यात, तर दुसरा सामना हॅम्पशायर आणि नॉटिंगघशायर यांच्यात खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने एजबस्टनमध्ये खेळले जाणार आहेत.

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल?
मालिका निर्णायक सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या सामन्यात फलंदाजीवेळी वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला होता. त्यामुळे तो अंतिम सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्याच्याजागी कोण खेळणार, याकडे लक्ष असणार आहे. या सामन्यात कुलदीप यादवला संधी मिळू शकते. तो पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये बाकावर बसला होता.
(लॉर्ड्स येथे भारत विरुद्ध एकदिवसीय सामन्यापूर्वी इंग्लंडचा मोठा निर्णय लियाम डॉसन आणि टॉम बँटन यांची संघातून मुक्तता)

Comments are closed.