‘हिटमॅन’ लॉर्ड्सवर शेवटचा सामना खेळणार? थोडं थांबा… रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांवर अखेर BCCI ने सोडलं मौन
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि टी-20 वर्ल्डकप विजेता रोहित शर्मा याच्यावर गेल्या काही काळापासून बॅट रुसली आहे. त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघत नसल्याने तो लॉर्ड्सवर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एक दिवसीय लढतीनंतर रोहित निवृत्ती घोषणा करू शकते असे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले. त्यामुळे ‘हिटमॅन’च्या चाहत्यांमध्ये घोर निराशा पसरली. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.
रोहित शर्माच्या भविष्याबाबत आणि निवृत्तीबाबत मीडियामध्ये सुरू असलेल्या सर्व चर्चा बीसीसीआयने फेटाळून लावल्या आहेत. रविवारी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर होणारा तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना हा रोहित शर्माचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल अशा वावड्या उठल्या होत्या. मात्र, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या सर्व चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रोहित शर्माच्या भविष्याबाबत सध्या माध्यमांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. रविवारी लॉर्ड्सवर होणारा सामना रोहितचा शेवटचा सामना असेल, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. रोहित हा भारतीय एकदिवसीय संघाचा नियमित आणि महत्त्वाचा सदस्य आहे. तो जोपर्यंत संघाच्या आगामी योजनांचा भाग आहे, तोपर्यंत देशासाठी खेळत राहील. म्हणजेच, लॉर्ड्सवरील वनडे सामना हा त्याचा शेवटचा सामना नसेल, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी ‘पीटीआय‘शी बोलताना स्पष्ट केले.
2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर रोहितने 2027 मध्ये विश्वचषक जिंकण्यासाठी चंग बांधला होता. हा टप्पा गाठण्यासाठी रोहित गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेत आहे. मात्र, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्या सामन्यात 11 आणि दुसऱ्या सामन्यात 26 धावांवर तो बाद झाला. रोहितच्या या खराब फॉर्मामुळे त्याच्या भविष्याबाबत आणि निवृत्तीबाबत सोशल मीडिया तसेच माध्यमांमध्ये विविध चर्चांना उधाण आले होते.
Comments are closed.