Video: आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक

अभिजीत दिपके: जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसलेल्या कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकली. जमावाने त्या महिलेला पकडले. यावेळी मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले. यावेळी अभिजित दिपके यांनी आंदोलनात पाचशे पाचशे रुपये देऊन गुंड घुसवल्याचा गंभीर आरोप केला. दुसरीकडे, दिल्लीच्या जंतर मंतरवर 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात नेले. पोलीस साध्या वेशात आले आणि त्यांनी वांगचुक यांना पांढऱ्या चादरीत गुंडाळून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. आंदोलकांनी विरोध केल्याने गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करून गरज भासल्यास त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश दिले होते.

आम्हाला वैद्यकीय अहवाल दाखवण्यात आला नाही

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या पत्नी, गीतांजली आंगमो यांनी सांगितले की, सोनम यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात आणण्यात आले होते, पण त्याबद्दल मला किंवा त्यांना कळवण्यात आले नाही. सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी काल संध्याकाळी त्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांचे सर्व महत्त्वाचे अवयव सामान्य होते. पण आता आम्हाला सांगण्यात येत आहे की, त्यांच्या पोटॅशियमची पातळी कमी झाली आहे आणि त्यांचा जीव धोक्यात आहे. जेव्हा आम्ही वैद्यकीय अहवालाची मागणी केली, तेव्हा तो आम्हाला दाखवण्यात आला नाही. त्यांनी पुढे सांगितले की, जर सोनम वांगचुक मोर्चात सहभागी होऊ शकले नाहीत, तर त्या त्यांच्या वतीने मोर्चाचे नेतृत्व करतील. सोमवारी नियोजित असलेला मोर्चा ठरल्याप्रमाणे होईल. “सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने येथे आणले आहे, याचा अर्थ असा नाही की मोर्चा थांबेल.” असे त्यांनी सांगितले.

वांगचुक यांची प्रकृती स्थिर

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल सांगितले की, त्यांना आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी सकाळी 7:40 वाजता आणण्यात आले. दीर्घकाळच्या उपवासामुळे आणि डिहाड्रेशनमुळे ते अशक्त झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांचे सर्व महत्त्वाचे मापदंड सामान्य स्थितीत आणण्यासाठी त्यांना सतत देखरेख, वैद्यकीय काळजी आणि उपचारांची आवश्यकता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.