शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन न्यायालयाकडून स्थगित, मालमत्ता जप्तीचा कडक इशारा
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे कोपर प्रभागाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. या मारहाण प्रकरणात न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीन स्थगित केला असून, त्यांना तात्काळ पोलिसांना शरण येण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण आणि धक्काबुक्की करण्याची धक्कादायक घटना घडली होती. या गंभीर प्रकरणात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील या हल्ल्याची दखल घेत न्यायालयाने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना यापूर्वी मिळालेला जामीन तातडीने स्थगित केला आहे. तसेच तातडीने पोलिसांना शरण येण्याचे त्यांना निर्देश दिले आहेत. जर म्हात्रे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही आणि ते पोलिसांना शरण आले नाहीत, तर त्यांच्या मालमत्तेवर थेट जप्तीची कारवाई करण्यात यावी, असे कडक निर्देश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत.
Comments are closed.