FDA ची म्हशीच्या गोठ्यावर धाड, जास्त दुधासाठी दिली जाणारी शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त

उल्हासनगर एफडीएची कारवाई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नातील भेसळ आणि बेकायदेशीर औषधांचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये एक मोठी कारवाई समोर आली आहे. म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे दिली जाणारी आणि शासनाने बंदी घातलेली तब्बल 612 ऑक्सिटोसिन (Oxytocin) इंजेक्शन्स एफडीएच्या पथकाने जप्त केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूल परिसरात असलेल्या प्रकाश वाधवानी याच्या म्हशीच्या गोठ्यावर एफडीएच्या पथकाने हा छापा टाकला. या छाप्यात जास्त दुधासाठी जनावरांना टोचली जाणारी 612 प्रतिबंधित इंजेक्शन्स आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

ऑक्सिटॉसिन साइड इफेक्ट्स: प्राण्यांसह मानवी आरोग्यासाठी मोठा धोका

ऑक्सिटोसिन या औषधाचा वापर जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि क्रूर मानला जातो. या इंजेक्शन्समुळे जनावरांना प्रचंड त्रास होतो. इतकेच नाही तर, अशा प्रकारे ऑक्सिटोसिन देऊन काढलेल्या दुधाचे सेवन केल्यास मानवी आरोग्यावर, विशेषतः लहान मुलांवर आणि गरोदर महिलांवर गंभीर दुष्परिणाम होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. याच कारणामुळे या औषधाच्या विक्रीवर आणि वापरावर शासनाने कायद्याने पूर्णपणे बंदी घातलेली आहे.

तुकाराम मुंढे एफडीए मोहीम: तबेला चालकावर कडक कारवाई

राज्यात सध्या सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून उल्हासनगरातील ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बेकायदेशीरपणे औषधांचा साठा बाळगल्याप्रकरणी आणि जनावरांच्या आरोग्याशी खेळ केल्याप्रकरणी संबंधित गोठा चालकावर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे उल्हासनगर आणि ठाणे जिल्ह्यातील बेकायदेशीर दुग्ध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

ही बातमी वाचा:

Comments are closed.