PoK मधील हिंसाचार: UN ने पाकिस्तानवर टीका केली
पाकिस्तान सरकारला दिला इशारा : सार्वजनिक सभांवर बंदी घालणे अयोग्य
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) अशांतता आणि सामान्य लोकांच्या विरोधातील हिंसक कारवाईने संयुक्त राष्ट्रसंघाचे (यूएन) लक्ष वेधले गेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संस्थेने पीओकेतील स्थितीवर चिंता व्यक्त केली. पीओकेत होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आंदोलकांच्या मृत्यू प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हणत यूएनने पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला आहे. 27 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी पीओकेत अत्यंत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर टर्क यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. जूनपासून आतापर्यंत पीओकेत हिंसेमुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. टर्क यांनी याप्रकरणी त्वरित अन् स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.
जेएएसीवर बंदी घालणे गैर
पीओकेत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जॉइंट अवामी अॅक्शन कमिटीवर (जेएएसी) बंदी घालण्याचा पाकिस्तानचा निर्णय चुकीचा असल्याचे टर्क यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने जेएएसीवर सार्वजनिक व्यवस्था आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचा दावा करत बंदी घातली आहे. तर या संघटनेच्या अनेक नेत्यांना अटक करत दडपशाही चालविली आहे. कुठल्याही नागरी समाज संघटनेला (जेएएसी) गुन्हेगार घोषित करणे आणि लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. हा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण मार्गाने एकत्र येणे आणि संघटनाच्या अधिकारांवरून गंभीर चिंता निर्माण करणारा असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणणे आहे.
इंटरनेटवरील बंदी हटवा
ताब्यात घेण्यात आलेल्या जेएएसी नेत्यांना कायदेशीर सहाय्य उपलब्ध करण्यात यावे. तसेच त्यांना स्वत:च्या परिवाराशी संपर्क साधू देण्यात यावा अशी सूचना यूएनने पाकिस्तानला केली आहे. तसेच पीओकेतील इंटरनेट सेवेवरील बंदी हटविण्यात यावी असे यूएनने स्पष्ट केले आहे. पूर्ण भागात इंटरनेटची पूर्ण सुविधा त्वरित सुनिश्चित करण्याचे आवाहन आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांना करत आहोत. तसेच स्थानिक लोकांच्या मूलभूत समस्या आणि तक्रारी दूर करण्यासाठी सर्व घटकांना चर्चेत सामील करण्यावर जोर दिला जावा असे वोल्कर टर्क यांनी म्हटले आहे.
खिशात हिंसा
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या दडपशाहीला या लोकांकडून विरोध केला जात आहे. आर्थिक संकट, महागाई आणि स्थानिक विधिमंडळातील राखीव जागांच्या मुद्द्यावरून पीओकेतील लोक आंदोलन करत आहेत. परंतु हे आंदोलन दडपण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने गोळीबाराचे सत्र आरंभिले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या क्रौर्यपूर्ण कारवाईत आतापर्यंत 50 हून अधिक आंदोलक तसेच महिलांना जीव गमवावा लागला आहे.
Comments are closed.