अभिषेक बॅनर्जी यांच्या 'बेकायदेशीर' कार्यालयावर बुलडोझर
पाच मजली इमारत जमीनदोस्त
वृत्तसंस्था, कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या ‘अवैध स्वरुपात निर्मित“ कार्यालयाला जमीनदोस्त करण्यासाठी बुलडोझर अॅक्शन घेण्यात आली आहे. या पाचमजली इमारतीला पाडविण्यासाठी तीन बुलडोझरची मदत घेण्यात आली आहे. अभिषेक यांचे हे कार्यालय अमताला-बारुईपूर मार्गावर होते. प्रशासनाने या इमारतीला पाडविण्यापूर्वी नोटीस जारी केली होती, परंतु यावर अभिषेक बॅनर्जी यांच्याकडून कुठलेच उत्तर देण्यात आले नव्हते, यानंतर शनिवारी प्रशासनाने ही कारवाई केली.
अभिषेक बॅनर्जी यांचे हे कार्यालय दक्षिण 24 परगणा येथे आहे. तर हे कार्यालय पाडविण्यात आल्यावर राज्यातील राजकीय वाद वाढला आहे. कारवाईवेळी भाजप तसेच तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. स्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून प्रशासनाला तेथील बंदोबस्त वाढवावा लागला.
या इमारतीची उभारणी मंजुरीशिवाय करण्यात आली होती असे प्रशासनाने नोटीस बजावून स्पष्ट केले होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून अभिषेक बॅनर्जी यांचे हे कार्यालय बंद होते. कुठल्याही प्रकारच्या दस्तऐवजाशिवाय ही इमारत उभी करण्यात आली होती असे प्रशासनाचे सांगणे आहे.
अभिषेक बॅनर्जींचे आरोप
यापूर्वी 3 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत अभिषेक बॅनर्जी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. माझे कार्यालय किंवा माझ्याशी संबंधित 25 जणांना योग्य नोटीस न देता तसेच कायदेशीर सुरक्षा उपायांचे उल्लंघन करत ताब्यात घेण्यात आले. हे सर्वकाही चौकशीच्या नावावर करण्यात आले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमकाविले जात आहे आणि माझ्याविरोधात खोटी साक्ष देण्यासाठी दबाव टाकला जातोय. फोन टॅप केले जात असून माझ्या परिवाराच्या सदस्यांनाही त्रास देण्यात येत असल्याचा आरोप अभिषेक यांनी केला होता.
Comments are closed.