राज्यसभेत नऊ नवीन सदस्यांनी शपथ घेतली.
वरिष्ठ सभागृहात भाजपचे बळ वाढले
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 9 नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. हे सदस्य कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, मेघालय, मिझोरम, राजस्थान आणि पश्चिम बंगालमधून निवडून आले आहेत. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी अधिवेशनाच्या प्रारंभीच अधिकृत स्वरुपात स्वत:ची जबाबदारी सांभाळली आहे.
सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेणाऱ्यांमध्ये गुजरातमधून निवडून आलेले भाजप नेते मुकेशभाई राठवा, कर्नाटकातून काँग्रेसचे पवन खेडा, मध्यप्रदेशातून भाजपचे महेश केवट आणि राजस्थानमधून भाजपचे सतीश पूनिया सामील आहेत. या सर्व नेत्यांनी आपाआपल्या राज्यांचे प्रतिनिधित्व करत राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. याचबरोबर मेघालयातून एनपीपीचे जेम्स संगमा, मिझोरममधून खियांग्ते लालतलुआंगकिमा यांनी वरिष्ट सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. तर पश्चिम बंगालमधून भाजपचे तीन सदस्य प्रकाश चिक बडाइक, सुष्मिता देव आणि सुखेंदु शेखर राय यांनीही सोमवारी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. हे तिन्ही नेते यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यसभेवर गेले होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नेत्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, ज्यानंतर पोटनिवडणुकीसाठी त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली होती.
राज्यसभेत हे नवे सदस्य सामील झाल्यावर सभागृहातील सदस्यसंख्येत बदल होईल. रालोआचे संख्याबळ वाढणार असल्याने केंद्र सरकारला महत्त्वाची विधेयकं वरिष्ठ सभागृहात संमत करवून घेणे तुलनेत सोपे ठरण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनात सरकारकडून परिसीमन विधेयक पुन्हा मांडले जाणार असल्याची चर्चा असल्याने राज्यसभेतील संख्याबळही महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.