काॅक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान शबाना आझमी यांना दम्याचा अ‍ॅटॅक; अश्रुधुरामुळे प्रकृती बिघडली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिल्लीतील जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. २० जुलैला संसदेकडे निघालेल्या विद्यार्थी मोर्चात सहभागी झालेल्या शबाना आझमी यांनी आंदोलकांवर सोडण्यात आलेल्या अश्रुधुरामुळे आपल्याला दम्याचा अ‍ॅटॅक आल्याचे सांगितले. मात्र, उपचारानंतर त्या पुन्हा आंदोलनस्थळी परतल्या आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला.

‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना शबाना आझमी म्हणाल्या की, त्यांना आधीपासूनच दम्याचा त्रास आहे. अश्रुधुरामुळे त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. सुदैवाने त्यांच्याकडे इनहेलर (पंप) असल्याने त्यांनी तातडीने त्याचा वापर केला. त्यानंतर त्यांना जवळील एका इमारतीत नेण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलनस्थळी जाऊन लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

शबाना आझमी यांनी विद्यार्थ्यांच्या धैर्याचे आणि संघर्षाचे कौतुक करत त्यांना सलाम केला. त्यांनी स्पष्ट केले की, त्या कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत आणि भविष्यातही कोणत्याही पक्षात सहभागी होण्याचा त्यांचा विचार नाही. समाजाशी संबंधित प्रश्नांवर नागरिक म्हणून भूमिका मांडणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. सीजेपी आंदोलनाला पाठिंबा देण्यामागचे कारण स्पष्ट करताना शबाना म्हणाल्या की, अनेक विद्यार्थी 20 दिवसांहून अधिक काळ उपोषण करत असून त्यांची प्रकृती खालावत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित मागण्या रास्त असून शिक्षणावर देशाच्या जीडीपीपैकी 6 टक्के खर्च करण्याची मागणी योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी सरकारने त्यांचे म्हणणे ऐकून संवाद साधावा आणि त्यांच्या भविष्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Comments are closed.