‘डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय’

दिल्ली जंतरमंतर येथे उद्धव ठाकरे “केंद्र सरकार ज्या बेरहमीने आणि असभ्यपणाने आंदोलक तरुण आणि महिलांवर अत्याचार करत आहे, हे कोणत्याही लोकशाहीचे लक्षण नाही. आज देशात जो आक्रोश दिसतोय, तो अचानक आलेला नाही; तर हा गेल्या १२ वर्षात साठलेला असंतोष आता उफाळून बाहेर पडतोय,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘जन की बात’ ऐकण्याऐवजी हुकूमशाही

आंदोलकांवर चालवलेल्या लाठीमाराचा आणि असभ्य वर्तनाचा निषेध करत उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या क्रूरतेने सरकार या तरुणांशी सुलूक करत आहे, ते पाहून आता लोक उघडपणे म्हणू लागले आहेत की यांच्यापेक्षा तर इंग्रज चांगले होते. जे सत्तेत बसले आहेत, त्यांच्या डोक्यात बहुमताची हवा गेली आहे आणि ती हवा काढायला जनतेला वेळ लागत नाही.” स्वतःच्या ‘मन की बात’ लादणाऱ्या सरकारने लोकांची ‘जन की बात’ ऐकली पाहिजे, असा सल्ला देत त्यांनी भूतकाळातील दाखले दिले. “इंदिरा गांधींच्या काळात सोनम वांगचुक यांचे वडील उपोषणाला बसले होते, तेव्हा पंतप्रधान स्वतः त्यांना भेटायला गेल्या होत्या. अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी मनमोहन सिंह सरकारने विलासराव देशमुखांना चर्चेसाठी पाठवले होते. लोकशाहीत चर्चा करणे हे सरकारचे कर्तव्य असते, पण हे सरकार चर्चा सोडून हुकूमशाही लादत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“महिलांवर अत्याचार, ही कोणती हिंदू संस्कृती?”

दिल्लीतील आंदोलनात 9-10 वर्षांच्या लहान मुलींवर आणि महिलांवर झालेल्या पोलिसांच्या बळाच्या वापरावर उद्धव ठाकरे अत्यंत आक्रमक झाले. “लहान मुलांवर आणि महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार केले गेले, काल एका तरुण मुलगीचे कपडे फाडले गेले, ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती असूच शकत नाही, ही निव्वळ ‘रावण संस्कृती’ आहे. जर आंदोलक मुले देशाचे भविष्य वाचवण्यासाठी राजीनामा मागत असतील, तर त्यात चुकीचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“मग देशातील विद्यार्थ्यांवर लाठ्या का?”

सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाडताना ठाकरे म्हणाले, “आरएसएस (RSS) कडून ‘पाकिस्तानसोबत चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा’ अशी विधाने केली जातात. मग जे तुमचे दरवाजे ठोठावत आहेत, देशाचे भविष्य घडवणारे तरुण न्याय मागायला आले आहेत, त्यांच्याशी बोलायला तुम्हाला कमीपणा का वाटतो? पाकिस्तानशी चर्चा करायची आणि देशातील विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवायच्या, हे कसले गणित आहे? आंदोलकांना बदनाम करण्यासाठी त्यांना ‘पाकिस्तानी’ किंवा ‘दहशतवादी’ ठरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्येच तर कोणी पाकिस्तानी घुसलेले नाहीत ना?” असा टोलाही त्यांनी लगावला.

“ही सरकारची मस्ती; आता जनताच रस्त्यावर उतरणार”

केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, “ही निव्वळ सरकारची मस्ती आहे आणि या मस्तीच्या विरोधात आता संपूर्ण देश पेटून उठला आहे. तरुण हे आपल्या देशाचे भाग्यविधाते आहेत, त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्यास ते गप्प बसणार नाहीत. आता लोकांना रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त करायचा आहे, त्यांना आता कोणीही रोखू शकत नाही,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.