शिवसेनेचे उद्या शिवतीर्थावर तिरंगा आंदोलन; हजारो तरुण गाणार एकसुरात राष्ट्रगीत, तरुणांचा आवाज बनण्यासाठी या!
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने शुक्रवार, 24 जुलै रोजी तिरंगा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सर्वधर्मीय, सर्वपक्षीय देशभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे तिरंग्याखाली एकत्र जमून सायंकाळी 5 वाजता एकसुरात राष्ट्रगीत गायन केले जाणार आहे.
दिल्लीतील क्रूर दडपशाही, देशभरातील विद्यार्थ्यांची अटक याचा निषेध आणि आपल्या देशासाठी लढणाऱ्या शूर तरुणांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे हे दाखवण्यासाठी हे शांततापूर्ण आंदोलन आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके आणि जंतरमंतरवरील सर्वांसोबत असाल तर या आंदोलनासाठी या. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांना आंदोलन करत असताना ज्याप्रकारे उचलून नेण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले, त्याच्याविरोधात तुम्ही उभे असाल तर या असे आवाहन करतानाच, त्यांच्यासोबत दडपशाही होऊ शकते तर लवकरच तुमच्यासोबतही होईल, असा सावधगिरीचा इशारा आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील तरुण, विद्यार्थी आणि नागरिकांना दिला आहे.
हातात तिरंगा घेऊन या!
जंतरमंतरवरील आंदोलनातील महिला आणि पुरुषांसोबत अत्यंत अमानुषपणे वागणाऱ्या राजवटीच्या क्रूर शक्तीच्या विरोधात तुम्ही उभे असाल तर या. हा सर्व देशभक्तांचा एक शांततापूर्ण मोर्चा आहे. हातात तिरंगा घेऊन आणि आपले राष्ट्रगीत गात, जागृत झालेल्या देशासाठी उभे राहूया, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हीच खरी देशभक्ती
सत्ताधाऱ्यांना योग्य प्रश्न विचारणे ही खरी देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम आहे. जे सत्तेत आहेत ते राष्ट्राची सेवा करण्यात अपयशी ठरल्यास त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यायलाच हवी. हिंदुस्थानी तरुणांना एक चांगले भविष्य मिळायला हवे असा ज्यांचा विश्वास आहे त्या सर्व नागरिक, राजकीय पक्ष आणि सर्व विचारधारेच्या लोकांनी पक्षाचे झेंडे न लावता हिंदुस्थानी तरुणांचा आवाज बनण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सर्वांना आमंत्रित केले आहे.
Comments are closed.