देशाची आणि न्यायालयाची परिस्थिती धृतराष्ट्रासारखी झालीय; मुलांच्या व्यथेचे, वेदनेचे सरकारला काहीही पडलेले नाही! – उद्धव ठाकरे

देशाची आणि न्यायालयाची परिस्थिती धृतराष्ट्रासाठी झाली आहे. न्यायमूर्तींना कॉकरोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. मुलांच्या व्यथेचे, वेदनेची जाणीव सरकारला नाही. त्यांना काही पडलेले नाही. त्यामुळे बेसुमार लाठीमार होत असून सरकार चालवत असलेल्या गुंडागिरीविरुद्ध कुणीही गप्प बसू नये, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी केला. तसेच आपण व्यक्त व्हायला पाहिजे. देशाची ताकद काय असते हे दाखवून देण्यासाठी 26 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत शिवतीर्थ येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये म्हटले.

मी कालच दिल्लीत जाऊन आलो. हा विषय केवळ नीटच्या परीक्षेपुरता मर्यादीत नाही. तिथे आम्हाला एक मध्यवयीन तरुण भेटला. त्याची विचारपूस केली असता तो म्हणाला, ‘माझा व्यवसाय नीट चाललेला होता. माझी रोजी रोटी व्यवस्थित चालू होती. पण नोटबंदीच्या वेळेला माझा उद्योगधंदा पूर्ण उद्ध्वस्त झाला. तो राग व्यक्त करायला मी आलेलो आहे.’ अर्थात हे निमित्त झाले. पण गेल्या काही वर्षातील राग हा आता उफाळून वर आलेला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

न्यायमूर्तींना या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे ते म्हणाले. दिल्लीमध्ये मला तिथल्या काही मुली भेटल्या. त्या संतप्त होत्या. आमचे कपडे फाडले गेल्याचे त्या सांगत होत्या. वाटेल तसे मारले गेले. काही ठिकाणी तर लाठ्या काठ्याला गंजलेले खिळे लावून मारले, डोकी फोडली गेली. न्यायालयाला कबुतरे, कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आले. पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. देशाची परिस्थिती आणि न्यायालयाची परिस्थिती धृतराष्ट्रासारखी झाली का? म्हणजे द्रोपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखे झालेले आहे. मधल्या काळात चंद्रचूड यांनी न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली होती. ती परत बांधली का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

हे सरकार आता कुणाला आपले वाटतेय असे दिसत नाही. आता हा विषय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता राहिलेला नाही. मुलांना, विद्यार्थ्यांना सरकार नकोसे झालेले आहे. हे विद्यार्थी, मुले तेच होते ज्यांनी अच्छे दिनची अपेक्षा करत या सरकारला निवडून आणले होते. पण हे सरकार निर्दयीपणाने वागत आहे. पंतप्रधानांनी आज एक ट्विट केले आहे. खरे म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काही हरकत नव्हती. यात कमीपणा बाळगण्याचे कारण नाही. आपली मुलं, आपली जनता आहे. त्यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाही. पहिल्या दिवशी सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते आणि चर्चेसाठी बोलावले असते तर आंदोलन इथपर्यंत ताणले गेले नसते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न; मुलांना मारलं जातंय, दबाव टाकला जातोय; हा कसला सत्तेचा माज? – राज ठाकरे

ते पुढे म्हणाले की, आज लोकांना व्यक्त व्हायचे आहे, इतके वर्षे साठलेला राग, असंतोष वर उफाळून आलेला आहे आणि त्याला वाट करू देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताहेत, सिव्हिल ड्रेसमधील काही गुंड पोलिसांच्या लाठ्या घेऊन मारहाण करताहेत. त्यांच्या हातात पोलिसांच्या लाठ्या कशा आल्या? त्यांच्याकडे पोलिसांची वर्दी नाही, नेम प्लेट नाही. मग हे आंदोलन मोडायला भाजपने पाकिस्तानमधून गुंड आणले का? त्यांची ओळख-पाळख नाही. काही विचारले तर निर्विकार चेहऱ्याने लोकांकडे बघत आहेत. त्यांना काहीही पडलेले नाही. मुलांच्या व्यथेची, वेदनेची त्यांना जाणीव नाही. बेसुमार लाठीमार करत आहेत. सरकार अशी गुंडागर्दी चालत असेल तर कुणीही गप्प बसू नये. आपण व्यक्त व्हायला पाहिजे. देशाची ताकद दाखवून देण्यासाठी रविवारी मोर्चाचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क ते सिद्धिविनियाक असा मोर्चा असणार आहे. एक तर सरकारला सुबुद्धी दे नाही तर सरकारच्या रुपाने देशावर आलेले अरिष्ट लवकराच लवकर दूर कर असे साकडे सिद्धिविनायकाला घालणार आहोत.

Comments are closed.