आंदोलक विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाचे निलंबन, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

काॅक्रोच विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईमध्ये सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला. आंदोलक विद्यार्थ्याला “पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन” अशी धमकी देणाऱ्या पोलिसाला अखेर निलंबित करण्यात आले आहे.

गृहखात्याने तातडीने ही कारवाई केल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि वस्तुस्थितीची खातरजमा केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित चालकाला त्याच्या सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणाहून हटवण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित पोलीस आंदोलक विद्यार्थ्याला दमदाटी करताना दिसत आहे. त्याच्या धमकीच्या भाषेमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यानंतर नागरिक आणि विविध राजकीय पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या व्हिडिओचा उल्लेख करत पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. “एका मुलाला पोलीस ’50 ग्रॅमची पावडर टाकेन’ अशी धमकी देतो. म्हणजे पोलिसांकडे अशी पावडर सहज उपलब्ध आहे का? तो पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वक्तव्यानंतर काही वेळातच गृहखात्याने संबंधित पोलिसावर कारवाई केली.

निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव पवन सांगळे असून, तो सायन पोलीस ठाण्यात चालक (ड्रायव्हर) म्हणून कार्यरत होता. व्हिडिओमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात घेऊन त्याला तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसनेही या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन संबंधित पोलिसावर कठोर कारवाईची मागणी केली होती. “एखादा पोलीस ’50 ग्रॅम पावडर’ची भाषा कशी करू शकतो? राज्यात अंमली पदार्थांचे रॅकेट नेमके कोण चालवत आहे? या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याचीही मागणी काँग्रेसने केली आहे.

Comments are closed.