Starter Marriage : ‘ट्रायल’ म्हणून लग्न? जाणून घ्या ‘स्टार्टर मॅरेज’ ट्रेंड म्हणजे काय?




स्टार्टर मॅरेज ट्रेंड


भारतीय संस्कृतीत लग्न हे दोन व्यक्तींसोबत दोन कुटुंबांचंही नातं जोडणारं पवित्र बंधन मानलं जातं. “सात जन्मांची साथ” ही संकल्पना आजही अनेकांच्या मनात तितकीच दृढ आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीसोबत नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलताना दिसत आहे. विशेषतः पाश्चात्त्य देशांमध्ये सध्या ‘स्टार्टर मॅरेज’ हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.

पहिल्यांदा हे नाव ऐकल्यावर आश्चर्य वाटू शकतं. कारण या संकल्पनेत लग्नाला कायमस्वरूपी नात्याऐवजी एक प्रकारचा ‘ट्रायल’ किंवा अनुभव म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावर आणि रिलेशनशिपविषयक चर्चांमध्ये हा विषय सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे.

नेमकं काय आहे ‘Starter Marriage’?
‘स्टार्टर मॅरेज’ म्हणजे आयुष्यभर टिकेलच या अपेक्षेपेक्षा, काही वर्षे एकत्र राहून नातं कितपत जुळतं हे पाहण्याचा दृष्टिकोन. अशा विवाहांमध्ये साधारणपणे 5 वर्षांच्या आतच जोडपी एकत्र राहण्याचा अनुभव घेतात. जर दोघांमध्ये मतभेद वाढले किंवा भविष्यात एकत्र राहणं शक्य नसल्याचं वाटलं, तर परस्पर संमतीने घटस्फोट घेऊन दोघेही स्वतंत्र आयुष्याचा मार्ग स्वीकारतात. या प्रकारात बहुतांश वेळा मुलं नसल्याने कायदेशीर प्रक्रिया तुलनेने कमी गुंतागुंतीची असते.

तरुणांना हा ट्रेंड का आकर्षित करतो?
आजची पिढी नात्यात भावनिक सुसंगतता, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मानसिक आरोग्याला अधिक महत्त्व देते. त्यामुळे आयुष्यभराचा निर्णय घेण्यापूर्वी नातं प्रत्यक्ष अनुभवण्याकडे काही जणांचा कल वाढला आहे.

हा ट्रेंड भारतात आहे का?
सध्या भारतात ‘स्टार्टर मॅरेज’ ही कोणतीही अधिकृत किंवा सामाजिकदृष्ट्या स्वीकारलेली विवाहपद्धती नाही. मात्र सोशल मीडिया, वेब सिरीज आणि जागतिक ट्रेंडमुळे याबाबत चर्चा वाढत आहे. भारतीय समाजात अजूनही लग्नाकडे दीर्घकालीन बांधिलकी म्हणूनच पाहिलं जातं.

‘स्टार्टर मॅरेज’ हा कोणताही कायदेशीर विवाहप्रकार नाही, तर नातेसंबंधांविषयीचा एक बदलता सामाजिक दृष्टिकोन आहे. प्रत्येक जोडप्याची मूल्यं, संस्कृती आणि अपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे हा ट्रेंड स्वीकारायचा की नाही, हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे.



Comments are closed.