ZIMvsIND: दोन वर्षांनंतर संघात परतलेल्या मयंक यादवची भन्नाट कामगिरी, पहिल्याच चेंडूवर विकेट घेत रचला इतिहास

भारताचा वरिष्ठ टी 20 संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळली जात असून, त्याला आजपासून (23 जुलै) सुरूवात झाली आहे. यामध्ये भारताच्या अंतिम अकरामध्ये अनेक बदल दिसले. अशोक शर्माने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तर मयंक यादव तब्बल दोन वर्षांनंतर संघात परतला आहे. त्याने येताच ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.

हरारेमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भारतीय खेळाडूंनी योग्य ठरवला. मयंकने डावाच्या पहिल्याच चेंडूवर झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेटला बाद केले. त्याने टाकलेला चेंडू 149 किमी प्रति तास वेगवान होता, ज्यामुळे बेनेट क्रीजवर अडकला. त्याने चेंडू टोलावला आणि विकेटकीपर इशान किशनने तो उत्तमरित्या झेलला. सुरूवातीला मैदानी पंचांनी त्याला नॉटआऊट दिले, मात्र चेंडू बॅटच्या कडला स्पर्शून गेल्याची इशानला खात्री होती. त्यामुळे नक्की चेंडू लागला की नाही. यासाठी रिव्ह्यू घेण्यात आला आणि तो यशस्वी ठरला.

या विकेटबरोबरच मयंकच्या नावावर ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली. तो टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा केवळ तिसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी अशी कामगिरी केली आहे.

अर्शदीपने न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेविरुद्ध 2024 टी 20 विश्वचषकाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. हार्दिकने 2025 च्या आशिया कपच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या सईम आयुबला बाद केले होते.

भारतीय गोलंदाजांनी टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्याच चेंडूवर घेतलेली विकेट
शायन जहांगीर (यूएसए) – अर्शदीप सिंग, न्यूयॉर्क, टी२० विश्वचषक २०२४
सॅम अय्युब (पाकिस्तान) – हार्दिक पांड्या, दुबई, आशिया चषक २०२५
ब्रायन बेनेट (झिम्बाब्वे) – मयंक यादवहरारे, 2026

अशी कामगिरी करणारा मयंक चौथा भारतीय
याबरोबरच मयंकने आणखी एका खास विक्रमाची नोंद केली आहे. त्याने त्याच्या मागील टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील डावात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. त्याने ऑक्टोबर 2024 मध्ये हैदराबाद येथे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 298 धावांचा पाठलाग करताना परवेझ हुसेन इमोनला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.

आता मयंक झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर विकेट घेत, आंतरराष्ट्रीय डावाच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा विकेट घेणारे चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. या यादीत तीनदा अशी कामगिरी करत भुवनेश्वर कुमार पहिल्या स्थानी आहे. हार्दिक, अर्शदीप आणि मयंक यांनी प्रत्येकी दोनदा अशी कामगिरी केली असून आर अश्विनने एकदा केली आहे.

टी 20 आंतरराष्ट्रीय डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
भुवनेश्वर कुमार (तीनदा)
हार्दिक पांड्या (दोनदा)
अर्शदीप सिंग (दोनाडा)
मयंक यादव (दोंडा)
रविचंद्रन अश्विन (एकदा)

Comments are closed.