अपयश आले तरी चालेल पण आयुष्यात कधी शॉर्टकट निवडू नका; सचिन तेंडुलकरचा विद्यार्थ्यांना सल्ला
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने देशात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने विद्यार्थ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. ”आयुष्यात आपयश आले तरी चालेल पण कधी शॉर्टकट निवडू नका”, असे सचिनने त्याच्या पोस्टमधून म्हटले आहे.
”माझे वडील प्राध्यापक होते. अनेक तरुण विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक आणि सल्लागार होते. त्यांनी सुरुवातीलाच एक धडा माझ्या मनावर बिंबवला होता, तो म्हणजे, “अपयश आले तरी चालेल, कधीही शॉर्टकट निवडू नका. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला एक चांगला समाज घडवायचा आहे. असा समाज जो शॉर्टकट्स पेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देईल. आजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळत नाहीये असं वाटत असल्याने ते नाराज आहेत. आपण त्यांना समजू शकतो. पण त्यांना असं वाटू नये म्हणून आपण सर्वांनी एकत्र येत काम केलं पाहिजे”, असे तेंडुलकर म्हणाला.
”हिंदुस्थानातील तरुणांमध्ये स्वप्न आणि उर्जा खूप आहे. ते आपल्या यशाचे इंधन आहे. आपण पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शाळा आणि प्रशासन असा एक समाज म्हणून आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तसंच आपल्या तरुणांना कायम प्रेरणा आणि उर्जा देण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. आपल्याला एक समाज घडवायचा आहे जिथे मेहनतीचे फळ मिळेल, प्रामाणिकपणाला वाव मिळेल आणि गुणवत्तेचाच विजय होईल. मला पूर्ण विश्वास आहे की, आपण सर्व मिळून असे मार्ग शोधू जे आपल्या मुलांचे भविष्य मजबूत करतील आणि त्यांच्या स्वप्नांचे रक्षण करतील”, असेही तेंडुलकर म्हणाला.
Comments are closed.