मुंबईत रविवारी धडक मोर्चा! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गर्जना
दिल्लीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांवर निर्दयीपणे लाठीहल्ला करण्यात आला. मुलांची डोकी फोडण्यात आली. आंदोलन चिरडण्याचा हरएक प्रयत्न सरकार करत आहे. मात्र विद्यार्थी ठाम आहेत. घराघरांत हे आंदोलन पोहचलं आणि घराघरांत पेटलंही आहे. हा राग, हा रोष आणि असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी मुंबईत रविवार, 26 जुलै रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची गर्जना आज शिवतीर्थ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील शिवरायांच्या पुतळ्यापासून ते प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिर असा हा मोर्चा निघेल. ‘एकतर सरकारला सुबुद्धी मिळो, नाहीतर सरकारच्या रूपाने देशावर आलेलं अरिष्ट लवकरात लवकर दूर कर,’ असे साकडे यावेळी बाप्पाला घातले जाईल. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, असेल तो फक्त तिरंगा! मोर्चात विद्यार्थी असतीलच, सोबत त्यांच्या पालकांनीही सामील व्हावे, अशी हाक ठाकरे बंधूंनी दिली. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर उपस्थित होते.
- तारीख 26 जुलै
- वेळ सकाळी 10 वा.
- स्थळ शिवतीर्थ ते सिद्धिविनायक
Comments are closed.