CJP चे आज देशव्यापी निषेध

विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीने (कॉक्रोच जनता पार्टी) गुरुवारी एक मोठी घोषणा केली. सीजेपीने शुक्रवार, 24 जुलै रोजी, एका मोठ्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाने केले आहे. आंदोलन करणारे विद्यार्थी सातत्याने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. देशभरातील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ एकता व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन केले जाईल, असे सांगून संघटनेने प्रत्येक जिह्यात एक दिवसीय शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले आहे.

‘सीजेपी’ने देशव्यापी आंदोलनाची हाक देताना विद्यार्थी आणि तरुणांना मोठ्या संख्येने या आंदोलनात शांततापूर्ण पद्धतीने सामील होण्याचे आवाहन केले आहे. पेपरफुटीचा मुद्दा आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्या व मागण्या मांडण्यासाठी हे आंदोलन आयोजित केले जात आहे. ‘सीजेपी’ने एका डिजिटल पत्रकाच्या माध्यमातून या आंदोलनाची माहिती दिली. हे पत्रक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहे. सदर पोस्टरवर ‘प्रत्येक जिल्ह्यात, एक दिवस, एक मागणी’ असा संदेश आहे. हे आंदोलन शुक्रवार, 24 जुलै रोजी होणार असून, विद्यार्थी संघटना आणि इतर सामाजिक संघटनांना स्थानिक परवानग्या मिळवण्यासाठी समन्वय साधण्यास आणि आवश्यक व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.

शांततापूर्ण आंदोलन करण्याची सूचना

सीजेपीने आंदोलनादरम्यान जमलेल्या लोकांना विद्यार्थ्यांच्या मागण्या जाहीरपणे वाचून दाखवण्याचे आणि ज्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले त्यांच्याशी एकजूट व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनाशी संबंधित प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी), माहितीपत्रके आणि निवेदनांचे मसुदे त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोस्टरच्या शेवटी ‘इन्कलाब जिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ यांसारख्या घोषणा देऊन देशभरातील लोकांना या शांततापूर्ण आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.