काश्मीरमध्ये प्रशासनाने दोन दहशतवाद्यांची घरे पाडली
लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना अद्दल
वृत्तसंस्था/अनंतनाग
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरा मोठी कारवाई केली आहे. हेड कॉन्स्टेबलचा जीव घेणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली. अधिकाऱ्यांनी या कारवाईविषयी गुरुवारी माहिती दिली आहे. अनंतनाग येथील लाल चौकात जम्मू-काश्मीर पोलीस विभागातील हेड कॉन्स्टेबल आशिक हुसैन कुरैशी यांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला होता. कुरैशी हे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेकरता तैनात होते. पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येच्या शिक्षेदाखल प्रशासनाने आरोपींची घरं जमीनदोस्त केली आहेत. बिजबेहराच्या गुरी येथील रहिवासी आदिल ठोकर आणि हसनपोरा येथील रहिवासी हारून गनई अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. या दहशतवाद्यांनी कुरैशी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. कुरैशी हे रिझर्व्ह पोलीस दलात तैनात होते तसेच स्पेशल ऑपरेशन ग्रूपशी जोडले गेलेले होते. घरं जमीनदोस्त करण्याचा उद्देश दहशतवादी जाळे उद्ध्वस्त करणे आणि दहशतवाद्यांच्या लॉजिस्टिकल सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरला नष्ट करणे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Comments are closed.