सोनम रघुवंशी यांचा जामीन रद्द.

पुन्हा तुरुंगात जावे लागणार : न्यायालयाकडून झटका

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

इंदोरमधील  व्यापारी राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा झटका दिला. न्यायालयाने तिचा जामीन रद्द केला असून 3 आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला. विवाहानंतर हनिमूनवर गेलेले इंदोरचे रहिवासी राजा रघुवंशी यांची हत्या झाली होती. याप्रकरणी पत्नी सोनम रघुवंशी, तिच्या प्रियकरासोबत अनेक लोकांना आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी सोनमला जामीन मंजूर झाला होता, ज्याच्या विरोधात मेघालय सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मेघालय सरकारची याचिका

सोनम रघुवंशीला जामीन मंजूर करणे योग्य नाही, तो रद्द केला जावा, असे मेघालय सरकारने याचिकेत म्हटले होते. राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जामीन आदेश एका तांत्रिक आधारावर मिळाला असून तो कायम ठेवणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद केला. अटकेशी निगडित दस्तऐवजामध्ये केवळ एक कायदेशीर कलमाचा क्रमांक टाइप करण्यात त्रुटी होती, इतक्या छोट्या तांत्रिक त्रुटीच्या आधारावर आरोपीला जामीन मिळू नये. आरोपी फरार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मेहता यांनी न्यायालयासमोर म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाकडून दोन पर्याय

मागील सुनावणीत न्यायालयाने सोनमच्या वकिलासमोर दोन पर्याय ठेवले होते. सोनम स्वेच्छेने आत्मसमर्पण करणार का किंवा तिचा जामीन रद्द करण्याचा निर्णय द्यावा अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली होती.

सोनमच्या वतीने युक्तिवाद

याप्रकरणी एकूण 94 साक्षीदार असले तरीही आतापर्यंत केवळ 4 साक्षीदारेंचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याप्रकरणी पुरवणी आरोपपत्रही दाखल झाले आहे. कठोर अटींसह जामीन मंजूर झाला होता, या अटींचे सोनम पालन करत असल्याने ती फरार होण्याची शक्यता नसल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलाने केला होता.

Comments are closed.