Jalna crime news – कष्टाने कमावलेल्या 9 लाखांवर चोरांचा डल्ला, गाडीची काच फोडून चोरी, बचतगटाच्या महिलांनी फोडला हंबरडा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कष्टाने जमा केलेले पैसे बँकेतून काढून काही मिनिटेही होत नाहीत तोच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना जालन्यातील भोकरदन येथे घडली आहे. या घटनेमुळे महिला बचतगटांमध्ये तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी जय योगेश्वर महिला बचतगट (कोठा जहागीर) च्या सुमारे १० महिला भोकरदन येथील भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. बँकेतून ९ लाख रुपयांची रक्कम काढून त्या जाफराबाद रोडवरील एका हॉटेलवर चहासाठी थांबल्या. त्यांनी ही सर्व रोकड आपल्या महिंद्रा पिकअप वाहनामध्ये ठेवली होती.

काही वेळाने पाहिले असता गाडीतील ९ लाखांची रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाडीची काच फोडून पैसे लांबवण्यात आले होते. ऐनवेळी पैसे चोरीला गेल्याचे समजताच महिलांना मोठा धक्का बसला. परिसरात शोधाशोध करूनही चोराचा कोणताही सुगावा लागला नाही.

पाळत ठेवून चोरी?

घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बँकेपासून ते हॉटेल आणि रत्नमाला लॉन्स परिसरापर्यंत महिलांवर कुणी पाळत ठेवली होती का, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. चोरांचा माग काढण्यासाठी बँक परिसर तसेच रस्त्यावरील दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेजची बारीक पडताळणी केली जात आहे. महिलांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

Comments are closed.