बघूया तिरंगा जिंकतो की हुकूमशाही – उद्धव ठाकरे
तिरंगा आंदोलनात सहभागी होत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘जेन-झी’शी संवाद साधला. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार केला गेला, अश्रूधूर सोडला गेला. सरकारच्या हातात बंदुका असतील, लाठय़ा असतील पण आमच्या हाती तिरंगा आहे, तुम्ही लाठय़ा, बंदुका घेऊन या… आम्ही तिरंगा घेऊन समोर उभे आहोत, बघूया तिरंगा जिंकतो की तुमची हुकूमशाही जिंकते, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी या वेळी भाजप सरकारला दिले.
उद्धव ठाकरे यांचे शिवतीर्थावर आगमन होताच उपस्थित तरुण-तरुणी, विद्यार्थी आणि नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी – जय शिवाजी अशा जोरदार घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे यांनी तिरंगा हाती घेऊन तो झळकवताच भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी शिवतीर्थाजवळचा परिसर दुमदुमला. उद्धव ठाकरे त्यांना संबोधित करताना म्हणाले की, इथे जमलेल्या गर्दीचे एक वैशिष्टय़ आहे. अनेक म्हणतात, इकडे आपल्या ओळखीचे कुणी नाही. हेच महत्त्वाचे आहे. आपण सर्व हिंदुस्थानी आहोत. आपल्याला आपली ओळख विसरून भीती दाखवून जे आतापर्यंत राज्य करत होते त्यांनी हे दृश्य पाहण्यासारखे आहे. मी जास्त काही बोलत नाही, पण ये जन की बात है ये जन की बात है… आता दिल्लीवाल्यांना ऐकावेच लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्याच्या मोर्चात मोठय़ा संख्येने सामील व्हा!
रविवार 26 जुलै रोजी होणाऱया तिरंगा मोर्चामध्येही अशाच प्रकारे राष्ट्रध्वज हाती घेऊन मोठय़ा संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
Comments are closed.