सुवर्ण पदकावर हिंदुस्थानची नजर; पाकिस्तानशी लढतीची शक्यता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटमध्ये हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघांनी मैदानात उतरण्यापूर्वीच दमदार मुसंडी मारली आहे. विद्यमान विजेत्या हिंदुस्थानला आणि पाकिस्तानला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाल्याने आता दोन्ही संघांची नजर सुवर्णपदकावर खिळली आहे. त्यातही अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी हिंदुस्थान-पाकिस्तान आमनेसामने येण्याची शक्यता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता चाळवणारी ठरली आहे.

महिलांच्या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थान आपल्या मोहिमेची सुरुवात जपानविरुद्ध करेल. उपांत्य फेरीत बांगलादेश किंवा चीन यांपैकी एका संघाशी सामना होण्याची शक्यता आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानशी दोन हात होण्याची दाट शक्यता असल्याने सुवर्णलढतीचे वातावरण आधीपासूनच तयार झाले आहे.

पुरुषांच्या गटात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थान थेट उपांत्यपूर्व फेरीत उतरणार असून, उपांत्य फेरीत पाकिस्तानशी महासंग्राम रंगू शकतो. प्राथमिक फेरीत अफगाणिस्तान, जपान, नेपाळ, हाँगकाँग, चीन, मलेशिया आणि ओमान हे संघ पात्रतेसाठी झुंजणार आहेत.

पुरुषांची क्रिकेट स्पर्धा 24 सप्टेंबरपासून सुरू होऊन 1 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाईल, तर महिलांची स्पर्धा 17 ते 22 सप्टेंबरदरम्यान रंगणार आहे. जपानमधील आइची प्रांतातील कोरोजी ऍथलेटिक पार्क येथे टी-20 स्वरूपात हे सामने होतील.

एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, हिंदुस्थानचे लक्ष्य केवळ विजय नाही, तर सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक कायम राखणे आहे. आणि जर अंतिम फेरीत पाकिस्तान समोर उभा राहिला, तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील हा सामना पुन्हा एकदा क्रिकेटविश्वाचे केंद्रबिंदू ठरेल.

Comments are closed.