IND vs ZIM: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास! या दिग्गज खेळाडूचा विक्रम केला उध्वस्त
टीम इंडिया आणि जिम्बाब्वेमध्ये (Team india vs Zimbabwe) सध्या 3 टी20 सामन्यांची मालिका सुरू असून टीम इंडियाने 2-0 ने मालिका आपल्या नावावर केली आहे. तत्पूर्वी दुसऱ्या सामन्यात (25 जुलै) रोजी 15 वर्षांच्या स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. वैभव केवळ 9 चेंडूंत 20 धावा करून बाद झाला. मोठी खेळी करता आली नसली, तरी या छोट्या खेळीच्या जोरावर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) क्रिकेटमध्ये एक मोठी कामगिरी केली आहे.
त्याने श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महेला जयवर्धनेचा (Mahela Jaywardhane) मोठा विक्रम मोडून एका विशेष यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. जिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सलामीला आलेल्या वैभवने 9 चेंडूंत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 222.22 होता. पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. परंतु, या खेळीच्या जोरावर त्याने आपल्या पहिल्या 5 टी-20 सामन्यांमधील धमाकेदार कामगिरी सुरूच ठेवली.
आता तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या 5 सामन्यांनंतर सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर महेला जयवर्धने तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.
या सामन्यानंतर वैभवने आपल्या सुरुवातीच्या 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 211.32 च्या स्ट्राइक रेटने 112 धावा पूर्ण केल्या आहेत, ज्यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. यासह त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या पाच सामन्यांनंतर सर्वाधिक स्ट्राइक रेटच्या बाबतीत महेला जयवर्धनेला (201.82) मागे सोडले आहे. आता या यादीत वैभव दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
या विशेष यादीत भारताचा माजी स्फोटक अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पहिल्या स्थानावर आहे. युवराजने आपल्या पहिल्या पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 235.09 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या, जो विक्रम आजही कायम आहे.
पहिल्या 5 टी20 सामन्यांनंतर सर्वाधिक स्ट्राइक रेट (पूर्ण सदस्य देश)
युवराज सिंग – २३५.०९
वैभव सूर्यवंशी – 211.32
महेला जयवर्धने – 201.82
मोहम्मद अश्रफुल – २०१.६७
रिचर्ड लेव्ही – 200.00
यापूर्वी वैभव सूर्यवंशीने जिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात आपले पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावून इतिहास रचला होता. त्या सामन्यात ताबडतोब फलंदाजी करत त्याने अवघ्या 19 चेंडूंत 50 धावांची तुफानी खेळी केली. यासह वैभव पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
वयाच्या 15 वर्षे आणि 118 दिवसांत टी-20 मध्ये पहिले अर्धशतक झळकावून त्याने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या बाबतीत त्याने जिब्राल्टरच्या लुईस ब्रूसचा विक्रम देखील मोडला आहे.
Comments are closed.