IND vs ZIM: ईशान किशनचे तुफानी अर्धशतक; अभिषेक शर्माच्या मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी

हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये 3 टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यात झिम्बाब्वेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाला या डावात हवी तशी सुरुवात करता आली नव्हती, पण इशान किशनने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत मिळून डाव सावरला. दरम्यान अर्धशतक पूर्ण करताच, इशान किशनच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे या सामन्यात झिम्बाब्वेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. डावाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला 2 मोठे धक्के बसले. वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा दोघेही स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि इशान किशनने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान इशान किशनने 31 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक झळकावलं. यासह तो भारतासाठी सर्वाधिक वेळेस अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या सहाव्या स्थानी पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने अभिषेक शर्माच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने सर्वाधिक 39 अर्धशतकं झळकावली आहेत. तर रोहित शर्माच्या नावे 37 अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. सूर्यकुमार यादवने 29 वेळेस अशी कामगिरी केली आहे. केएल राहुलने 24 वेळेस, तर इशान किशनने 13 वेळेस अशी कामगिरी केली आहे. अभिषेक शर्माच्या नावे देखील 13 वेळेस अर्धशतकी खेळी करण्याची नोंद आहे. इशान किशनने या मोठ्या रेकॉर्डमध्ये अभिषेक शर्माच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच 2 मोठे धक्के बसले. अभिषेक शर्मा 8 तर वैभव सूर्यवंशी 20 धावा करुन माघारी परतला. कर्णधार श्रेयस अय्यरने 25 धावांचे योगदान दिले. इशान किशनने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. शेवटी रिंकू सिंगने 12 आणि तिलक वर्माने नाबाद 60 धावांची खेळी करुन भारतीय संघाची धावसंख्या 20 षटकांअखेर 219 धावांवर पोहोचवली.

Comments are closed.