हिंदुस्थानचा दमदार मालिका विजय, दुसरी टी-20 लढतही जिंकली, इशान-तिलकची अर्धशतके

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्रेयससेनेने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यावहिल्या मालिका विजयाची चव चाखली. यापूर्वी आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये त्यांना एकही सामना जिंकता आला नव्हता, पण हिंदुस्थानने दुसऱया टी-20 सामन्यातही झिम्बाब्वेवर सहज मात केली आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. ईशान किशन आणि तिलक वर्माच्या अर्धशतकांच्या जोरावर हिंदुस्थानने 219 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला 129 धावा करता आल्या आणि हिंदुस्थानने 90 धावांनी मोठा विजय साकारला.

अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी हे दोघेही या सामन्यात अपयशी ठरले. त्यामुळे संघाची 2 बाद 19 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर ईशान किशन मैदानात आला आणि त्याने दणकेबाज फटकेबाजी सुरू केली. ईशानला यावेळी तिलक वर्माची सुरेख साथ लाभली. ईशानने यावेळी फक्त 44 चेंडूंत 9 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 81 धावांची दणदणीत खेळी साकारली. तिलकने ईशानला साथ देताना फक्त 29 चेंडूंत 5 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 60 धावा फटकावल्या. त्यामुळेच हिंदुस्थानला 219 धावांचा डोंगर उभारता आला.

झिम्बाब्वेला हिंदुस्थानचे 220 धावांचे आव्हान पेलवले नाही. प्रिन्स यादव आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवत झिम्बाब्वेच्या डावाला सुरुंग लावला. त्यानंतर फलंदाजीत काही न करू शकणाऱया अभिषेकने तीन विकेट्स मिळवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

हिंदुस्थान ः 20 षटकांत 5 बाद 219 (ईशान किशन 81, तिलक वर्मा नाबाद 60; ब्रायन बेनेट 1/22) विजयी वि. झिम्बाब्वे ः 17.5 षटकांत सर्व बाद 129 (ब्रायन बेनेट 32; अभिषेक शर्मा 3/17, प्रिन्स यादव 2/10).

Comments are closed.